Dharashiv Loksabha News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Loksabha News: परभणी लोकसभेचा सस्पेन्स महायुती कधी संपवणार ?

Prasad Shivaji Joshi

Parbhani News : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात होण्यास थोडा कालवधी शिल्लक असताना महायुतीने मात्र अद्यापही परभणी लोकसभा मतदारसंघ कोणाकडे असेल आणि उमेदवार कोण असेल? याबाबत काहीही उघड केले नसल्याने मतदारांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणुक लढवण्यास महायुतीमधील तिन्ही पक्ष उत्सुक आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर, लोकसभा समन्वयक व माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांची नावे आघाडीवर आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर शिवसेनेकडूनही परभणी लोकसभा मतदारसंघावर दावा केला जात आहे. महायुतीच्या वतीने परभणी येथील मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र येथेही नेत्यांमधील अंतर्गत मतभेदाचे उघड प्रदर्शन झाले.

त्यानंतर मानवत येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात तर तिनही प्रमुख पक्षाचे जिल्हाध्यक्ष व तीनही आमदार अनुपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व आमदार बाबाजानी दुर्राणी, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुखही अनुपस्थित होते.

तसेच भाजपचे पाथरी विधानसभा प्रमुख व माजी आमदार मोहन फड यांनी सुध्दा कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे तर आतापर्यंत एकदाही महायुतीच्या कार्यक्रमात दिसले नाहीत.

एकीकडे अशी परिस्थिती तर दुसरीकडे महायुतीतला कोणता पक्ष लोकसभा लढवणार हे स्पष्ट नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. भाजपने(BJP) मागील दोन महिन्यापासून तयारी सुरु केली आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पक्षाच्या गावपातळीपासून ते वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. यामुळे मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती झाली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी परभणी लोकसभा मतदार संघाचा दौरा केला होता. त्यानंतर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवडा यांचाही दौरा होता, पण तो अचानक रद्द झाला. ते परभणी ऐवजी नांदेडला गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही राजेश विटेकर यांच्या उमेदवारीसाठी जोर लावला आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून आपल्याला पाहिजे ते पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दादांच्या दादागिरीवर भलताच विश्वास असल्याचे दिसते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा नुकताच झालेला परभणी दौरा आपला लोकसभेवरील दावा बळकट करण्यासाठीच होता, असे बोलले जाते.

राज्याच्या सत्तेचे स्टेअरिंग हाती असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचा पक्ष मात्र फारसा उत्सूक दिसत नाही. खरतर ही जागा शिवसेनेकडे जायला हवी, पण तसा दावा शिंदेंच्या स्थानिक नेत्यांकडूनही फारसा होतांना दिसत नाही. महायुतीमधील जागावाटपाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जागावाटपाचा गुंता सधी सुटतो? उमेदवार कधी जाहीर होतात? याची तीनही पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते चातकासारखी वाट पाहत आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT