Devendra Fadnavis and Manoj Jarange  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange On Fadnavis : " ते चौकटीच्या बाहेरचं काही बोलले नाहीत, मी पण..."; फडणवीसांच्या फोनवरून जरांगेचं मोठं विधान

Deepak Kulkarni

Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मागे घेतले. मात्र, जरांगे यांनी मराठा आरणक्षासाठी लढा उभारल्यानंतर पहिल्यापासून त्यांच्या निशाण्यावर दोन व्यक्ती प्रामुख्याने असल्याचे लपून राहिलेले नाही. त्या व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ हे आहेत. या दोनही नेत्यांवर जरांगेंनी सडकून टीका केली होती. त्यातच फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी हल्लाबोल केला होता. यावरून उलट-सुलट चर्चाही रंगल्या होत्या.

पण सरकारच्या शिष्टमंडळाच्या मध्यस्थीला यश आल्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर सरकारनेदेखील मराठा आरक्षणासाठी जोरदार पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटलांना फोन केला होता. त्यांच्या तब्येतीची चौकशीही केली होती. ही बाब आता खुद्द जरांगे पाटलांनीच समोर आणली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) छत्रपती संभाजीनगर येथे मीडियाशी संवाद साधतानाच मंत्री छगन भुजबळांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या संवादावरही भाष्य केले. ते म्हणाले, उपोषण मागे घेतल्यावर देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता. त्यांनी प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्याशी चांगला संवाद झाला. ते चौकटीच्या बाहेरचं काही बोलले नाहीत, मी पण चौकटीच्या बाहेर काही बोललो नाही, असेही ते जरांगे म्हणाले.

आम्ही काही त्यांचा द्वेष करत नाही. फडणवीस यांचं आणि माझं काही शत्रुत्व नाही. त्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मी फोनवर बोललो. व्यवस्थित बोलणं झालं,” असं उत्तर जरांगे पाटील यांनी सांगितले.

छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) टीकेचाही मनोज जरांगे पाटलांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, भुजबळ हे मराठा आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करू पाहात आहेत. मात्र, त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. माणसाने थोडसं भानावर येऊन बोललं पाहिजे. साखळी उपोषण करणारे मुलं, शांततेत आंदोलन करणारी मुलं घरी परतल्यानंतर मराठा समाजाचं आंदोलन बदनाम व्हावं म्हणून काही गोष्टी केल्या गेल्या. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना टार्गेट केलं जातं. साखळी उपोषण करणाऱ्यांना उचलून नेत आहेत. आम्ही त्यांच्याबद्दल बोललो आहेत.

भुजबळच एक मोठा मास्टरमाइंड

भुजबळ ओबीसींचं आरक्षण संपवायचं आहे असं म्हणत आहेत. पण त्यांचं आरक्षण कसं काय संपणार? असं सवाल उपस्थित करतानाच आयोगाच्या माध्यमातून जे मराठा समाजाचं हक्काचं आहे तेच द्या म्हणतोय. आम्ही कुणाचंही आरक्षण काढा, असा दावा केलेला नसल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

छगन भुजबळ यांच्याशी आमची दुश्मनी नाही. खरा अन्याय झाला आहे तिथे छगन भुजबळ जात नाहीत. त्यांच्या पाहुण्या रावळ्यांबद्दल काही झालं की धाव घेतात. त्यांचा मास्टरमाइंड कोण मी कसं काय सांगणार? भुजबळच एक मोठा मास्टरमाइंड आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

भुजबळांचे आरोप काय...?

छगन भुजबळांनी बीडमधील जाळपोळीच्या घटनांची पाहणी केली. यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका करताना ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरही परखड भाष्य केले . ते म्हणाले, एक लक्षात ठेवा, एकदा कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर त्यांना सर्वच स्तरावर आरक्षणाचा हक्क मिळतो. तेली, धनगर, माळी समाजाच्या सर्वांनी लक्षात घ्यावं.

एवढा मोठा समाज सरसकट आला तर सर्वांचं नुकसान होईल. ज्या जालन्याच्या समता परिषदेच्या मैदानावरून शरद पवारांनी आरक्षणाची घोषणा केली,आरक्षण दिलं, तिथूनच आरक्षण संपवण्याचं काम राज्यात सुरू आहे, असा आरोप छगन भुजबळांनी केला.

...तर मग ओबीसींना काय न्याय मिळणार ?

छगन भुजबळ म्हणाले, जरांगे यांच्या उपोषणाच्या वेळी लाठीचार्ज झाला. त्यामध्ये पोलिस जखमी झाले त्यांची बाजू पुढे आले नाही. 70 पोलिस जखमी झाल्यावर काय करणार? त्यांच्या आमच्या सरकारने बदल्या केल्या. पोलिसांवर कारवाई झाली म्हणून काय व्हायचे तर होऊ द्या हे त्यांनी ठरवलं असावं. पोलिसांवर हल्ला झाला त्याची कडक चौकशी झाली पाहिजे. मनोज जरांगे यांचे उपोषण सोडायला माजी न्यायमूर्ती जात असतील तर आम्हाला काय न्याय मिळणार? मंत्री जातात ते ठीक पण न्यायमूर्ती त्यांना सर म्हणतात, त्यांच्या पाया पडतात, तर मग ओबीसींना काय न्याय मिळणार,असेही ते म्हणाले.

फडणवीसांचा एकेरी उल्लेख अयोग्य...

छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) एकेरी उल्लेख केला. ते अयोग्य असल्याची टीका केली. तसेच त्यांनी आमच्याकडे चर्चेला यावं, आम्ही त्यांना संरक्षण देऊ, असेही जरांगे म्हणाले होते. त्यावर भुजबळ म्हणाले, फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहे. त्यांना संरक्षण आहेच की, त्यांना तुमच्या संरक्षणाची गरजच काय, अशी टीका छगन भुजबळांनी केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT