Karmala News : करमाळा तालुक्यातील सभासद आणि शेतकऱ्यांचा आधार असलेला मकाई सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामामध्ये बंद राहिला. परंतु मागील हंगामातील ऊस बिले अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने तालुक्यामध्ये आठ दिवसांत तब्बल दोन वेळा कारखाना संचालक मंडळाच्या विरोधात आंदोलन झाले. सध्या कारखाना बागल गटाच्या ताब्यात आहे.
बिल मिळावे म्हणून बोंबाबोंब आंदोलनात तरटगाव येथील शेतकरी हरिदास मोरे यांनी अधिकाऱ्यांसमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अद्यापही बिल मिळालेले नाही. याच पार्श्वभूमीवर थू - थू आंदोलनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. शहराच्या मध्यभागी लावलेल्या पोस्टरवर पंचायत समितीचे माजी सदस्य सावंत गटाचे राहुल सावंत, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे व दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांचे फोटो आहेत. करमाळा Karmala तालुक्यात सध्या हे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत.
काही दिवसांपूर्वीच मकाई कारखान्याची Makai Sugur Factory निवडणूक झाली होती. यात प्रा. झोळ यांनी उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्यासह सहकाऱ्यांचे अर्ज नामंजूर झाल्याने पॅनेल देता आले नाही. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे व त्यांचे सहकारी प्रा. झोळ यांच्याबरोबर होते. तरीही सभासदांनी त्यांना नाकारले, त्यामुळे बागल गटाच्या हाती सत्ता गेली. त्यानंतर नवीन संचालक मंडळाकडून शेतकऱ्यांचे पैसे मिळतील अशी अशा होती.
मात्र, अजूनही संचालक मंडळाला व सत्ताधारी बागल गटाच्या प्रमुखांना बँकेकडून कर्ज मिळू शकलेले नाही. प्रशासनाकडूनही शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याच्या दृष्टीने कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ७ डिसेंबरपर्यंत पैसे न मिळाल्यास शेतकरी संघर्ष समितीकडून शुक्रवारी करमाळा तहसीलसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही समितीच्या वतीने सांगण्यात आले.
थकीत ऊसबिलाबाबत अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी सूचक विधान केले होते. ज्या कारखान्याची थकीत ऊसबिले आहेत, त्याबाबत आपण जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि सहकार साखर आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी म्हटले होते. बागल गटाचे दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांना करमाळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मागील काही वर्षांपूर्वी माढा तालुक्यातील संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार धनाजी साठे यांनी थकलेल्या ऊसबिलांच्या बाबतीत स्वतःची जमीन विकून शेतकऱ्यांना बिल अदा केले होते. तीच भूमिका बागल गटाला का जमत नाही ? असा सवालदेखील शेतकरी सभासदांमधून विचारला जात आहे. तसे केल्यास शेतकरी व सभासदांमध्ये बागल गटाची विश्वासार्हता कायम राहील, असे बोलले जात आहे.
Edited By : Amol Sutar
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.