Rajesh Tope, Devendra Fadnavis, Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Rajesh Tope News: राजेश टोपेंवरील गंभीर आरोप त्यांना फोडण्यासाठी तर नव्हे..?

Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation : अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीहल्ला आणि अमानुष मारहाण झाली.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार राजेश टोपे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षण आंदोलनावरुन सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांत टोपे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले.

अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीहल्ला आणि अमानुष मारहाण झाली. यावेळी आंदोलकांकडून पोलिसांवर जी दगडफेक झाली, ते दगड टोपे यांच्या समर्थ साखर कारखान्यातून ट्रकमध्ये भरुन आणले होते, असा गंभीर आरोप करण्यात आला.

अर्थात टोपे यांनी हे आरोप फेटाळत कुठल्याही चौकशीला समोर जाण्याची तयारी दाखवली. मुळात टोपे यांच्यावर विधिमंडळांच्या अधिवेशनात एवढा गंभीर आरोप करण्यामागे त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून फोडण्याचा डाव तर नाही ना? अशी चर्चा होऊ लागली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत बंड झाले, तेव्हा मराठवाड्यातील जे दोन आमदार शरद पवारांसोबत खंबीरपणे राहिले, त्यात राजेश टोपे यांचाही समावेश आहे.

नुकतीच पुण्यात कालवा लवादाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार आणि राजेश टोपे यांच्यात गुप्त भेट झाल्याचा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमाशी बोलतांना केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांना सत्ताधाऱ्यांकडून घेरण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांना सत्तेतील राष्ट्रवादीमध्ये येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना राजेश टोपे यांच्याकडे आरोग्य खात्याचा कारभार होता.

दरम्यानच्या काळात आलेल्या जीवघेण्या कोरोना साथीत आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांच्या कामाचे कौतुक देशभरात झाले होते. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या आत्मचरित्रात टोपे यांच्या कार्याचा उल्लेख करत टोपे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. राष्ट्रवादी एकच असतांना टोपे यांचे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यांशी कौटुंबिक संबंध होते. पक्ष फुटल्यानंतर टोपे यांनी मोठ्या साहेंबाची साथ देण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी भाजपने लावून धरली. आरोग्य मंत्री म्हणून कोरोना काळात खरेदी करण्यात आलेल्या औषधी आणि वैद्यकीय उपकरणांचीही चौकशी करण्याची मागणी झाली. तेव्हा संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले टोपे गळाला लागतील, असा अंदाज बांधण्यात येत होता. पण टोपे शरद पवारांसोबत कायम राहिले.

आता मराठा आंदोलन आणि त्याला अंतरवाली सराटीत लागलेले हिंसक आंदोलन याचा थेट संबंध राजेश टोपे (Rajesh Tope) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जोडून टोपेंवर पक्ष सोडण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. मराठवाड्यात बीड आणि घनसावंगी या दोन मतदारंसघाचे आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. जालना जिल्ह्यात टोपे यांच्यामुळे राष्ट्रवादीचे अस्तित्व आहे, त्यामुळे त्यांना गळाला लावण्यासाठी महायुती विशेषतः अजित पवारांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT