Sambhaji Patil Nilangekar sanjay bansode sudhakar shrungare Sarkarnama
मराठवाडा

Loksabha 2024 : लातूरमधून लोकसभेचा उमेदवार कोण? राजकीय विश्लेषक करताहेत निलंगेकरांच्या 'मौनाचे भाषांतर'

Jagdish Pansare

Latur Loksabha Election 2024 : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे ( Loksabha Election ) वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 'इंडिया' आघाडीसह 'एनडीए'तील इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरूवात केली आहे. लातूर लोकसभा ( Latur Loksabha ) मतदारसंघातही माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर सक्रिय झाले आहेत. पण, लातूरमधील उमेदवारीबाबत आमदार निलंगेकरांनी ( Sambhaji Patil Nilangekar ) मौन बाळगलं आहे.

महायुतीच्या मेळाव्यातून गायब झालेले आमदार निलंगेकरांनी 'गाव चलो अभियाना'ची माहिती देण्यासाठी लातुरात अवतरले. या अभियानाची माहिती देण्यासाठी आमदारांनी पत्रकार परिषद घेतली. 2019 मध्ये भाजपचा ( Bjp ) उमेदवार ठरवण्यापासून ते त्याच्या विजयापर्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या निलंगेकरांनी यंदा मात्र स्वत:ला या प्रक्रियेपासून दूर ठेवल्याचं चित्र आहे.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असेल? असा प्रश्न निलंगेकरांना विचारण्यात आला. त्यावर "मला माहिती नाही. पण, आमचा उमेदवार कमळाचाच असेल," असं सूचक विधान निलंगेकरांनी केलं.

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत दीड लाखांहून अधिक मताधिक्यानं सुधाकर श्रृंगारे खासदार म्हणून विजयी झाले होते. पण, खासदारांबद्दल आणि त्यांनी पाच वर्षात मतदारसंघात केलेल्या कामाबद्दल निलंगेकरांनी अवाक्षरही काढलं नाही. निलंगेकरांचे सूचक मौन भाजप लातूरमध्ये उमेदवार बदलण्याचे संकेत मानले जाते.

राष्ट्रवादीचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे आणि निलंगेकरांमध्ये जवळीकता वाढली आहे. त्यामुळे लातूरमध्ये महायुतीचे उमेदवार बनसोडे असण्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्यात निलंगेकरांनी लातूर लोकसभेच्या उमेदवारीबद्दल विचारेल्या प्रश्नाला बगल देत 'कमळा'चाच उमेदवार, असेल असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला.

आता कमळ चिन्हावर बनसोडेही महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभा लढवू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसांपुर्वी विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारेंनी बनसोडेंच्या नावाबाबत सुरू असलेल्या चर्चेबद्दल बोलताना, "ही जागा भाजपची आहे. त्यांना लोकसभा लढवायची असेल, तर आधी भाजपमध्ये यावे लागेल," असे सांगत एकप्रकारे बनसोडेंच्या उमेदवारीबद्दल सुरू असलेल्या चर्चेला दुजोराच दिला होता. मग महायुतीकडून ते कमळाच्या चिन्हावर लढले तर आश्चर्य वाटायला नको.

निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. अशावेळी अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल कुठलीच, अशी ठोस चर्चा जिल्ह्यात होतांना दिसत नाही. दोन्हीकडचे स्थानिक नेते वरिष्ठांकडे बोट दाखवून तुर्तास या चर्चेपासून पळ काढतांना दिसत आहेत. महायुतीच्या मेळाव्याला गैरहजर असलेले निलंगेकर आता पुन्हा सक्रीय झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीची सुत्र त्यांच्या हाती देण्याचा निर्णय झाला की काय? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत.

Edited By : Akshay Sabale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT