Loksabha Election 2024: निवडणुकीपूर्वी पेटणारं पाणी लोकसभेत कोणाला तारणार ?

Political News: पालकमंत्री दादा भुसेंनी सोमवारी पाण्याच्या नियोजनासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.
Chhagan bhujbal, dadabhuse
Chhagan bhujbal, dadabhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: सर्वाधिक धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा दुष्काळाची स्थिती आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. नाशिक शहरावर सुद्धा पाणी कपातीचे संकट आहे. आगामी निवडणुकांमध्ये ‘पाणी’ हा महत्वाचा मुद्दा समोर येईल. पालकमंत्री दादा भुसेंनी (Dada Bhuse) सोमवारी पाण्याच्या नियोजनासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. एकंदरीत लोकसभा निवडणुकीत पाणी पेटणार आणि कोणाला तारणार, याचे आडाखे राजकीय वर्तुळात आखले जात आहे.

पावसाच्या असमान वितरणाचा फटका यंदा नाशिक जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असलेल्या उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्यापेक्षा अधिक घटली. दुसरीकडे कांदा निर्यातबंदीने शेतकरी त्रस्त आहे. हातात असलेल्या पीकाला भाव नाही आणि दुसरे पीक हातचे गेले अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती आहे. शेतीचे अर्थकारण मंदावलेले असताना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागतो आहे. ऐन पावसाळ्यात जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शेकडो टँकर सुरू झालेत.

Chhagan bhujbal, dadabhuse
NCP News: मालेगाव टेंडर घोटाळा; राष्ट्रवादीने मंत्री दादा भुसेंना घेरले?

आठवड्यागणिक टँकरच्या फेऱ्यांमध्ये वाढ होत आहे. यात इगतपुरी, सिन्नर, कळवण, बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, येवला अशा तालुक्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी येवल्यातील भाजपच्या इच्छूक उमेदवार असलेल्या अमृता पवार यांनी पाणी प्रश्नाचा मुद्दा हातात घेतला. मागणी नोंदवून ही पाणी मिळत नसल्याचा आरोप करीत त्यांनी चारी क्रमांक २४ आणि २५ चे कुलूप तोडून पाणी सोडले. मात्र यामुळे चारीच्या शेवटी असलेल्या अनेक गावातील शेतकऱ्यांना पाणी पोहचलेच नाही. त्यामुळे हे शेतकरी आक्रमक झालेत. त्यांनी उषोषणाचे हत्यार बाहेर काढले. मुळात कमी असलेल्या पाणीसाठ्याचे वितरण योग्य पद्धतीने करण्याचा दबाव प्रशासनावर आहे.

पाणी प्रश्नात सत्ताधारी गटाचा आमदार, विरोधक आणि प्रशासन अशी फळी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडणार नाही, याची झलक यानिमित्ताने पुढे आले. जिल्ह्याच्या उर्वरीत भागात हीच परिस्थिती सध्या आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १९९ गाव आणि वाड्यांवर सध्या टँकरने पाणी पोहच केले जाते आहे. याठिकाणी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे प्रतिनिधित्व करतात. पाणी प्रश्न हातात घेऊनच सुहास कांदे नांदगावच्या राजकारणात उतरले आणि राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांना पराभूत करून विधानसभेत पोहचले. आता सत्ताधारी असलेले कांदे दुष्काळ परिस्थितीत मतदारांना सोबत कसे ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालकमंत्री दादा भुसेंच्या मालेगाव तालुक्यात १७ गावे आणि १३ वाड्यांच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. सिन्नर तालुका सुद्धा दुष्काळी म्हणून शासनाने जाहीर केला आहे. आजमितीस नाशिकमधील एकूण धरणसाठा ५० टक्क्यांपर्यंत खाली पोहचला आहे. उन्हाचा चटका वाढेल तसे पाण्याच्या साठ्यात तीव्रतेने घट होईल. पाण्याची सर्वाधिक भीषणता निवडणूक काळातच समोर येईल. ग्रामीण भागात बिकट परिस्थिती असली तरी नाशिक महापालिकेला सुद्धा पाणी कपात करण्यासाठी धोरण आखावे लागणार आहे.

तीन लोकसभा मतदारसंघासाठी पाणी संकट

पाणी कपात केली नाही तर, मे आणि जून महिन्यात शहरात सुद्धा पाणीबाणी स्थिती निर्माण होईल. मात्र, प्रशासकीय राजवट असल्याने पाणी कपातीचा निर्णय अद्याप झालेला नाही. एकंदरीत नाशिक, दिंडोरी आणि मालेगाव-धुळे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी पाण्याचे दुर्भिक्ष हा महत्वाचा मुद्दा असून, थेट मतदारांशी निगडीत असलेल्या या विषयावर राजकीय पक्ष काय भुमिका घेतात आणि मतदारांना त्या कशा भावतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

(Edited By : Sachin Waghmare)

Chhagan bhujbal, dadabhuse
Sameer Bhujbal On Anjali Damania: 'अंजली दमानिया फर्नांडीस कुटुंबीयांचा राजकारणासाठी वापर करतायेत'; समीर भुजबळांचा आरोप

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com