Satish Chavan-Suresh Bankar-Dinesh Pardeshi News Sarkarnama
मराठवाडा

Mahavikas Aghadi News : उमेदवारीसाठी पक्ष बदलला अन् पराभूत होताच पुन्हा स्वगृही परतले! याला निष्ठा म्हणतात का?

Satish Chavan, Suresh Bankar, and Dinesh Pardeshi changed their party for candidacy, and now, after two months, they return to their original party. : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, सिल्लोड या तीन मतदारसंघात उमेदवारीसाठी युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप पक्षाच्या इच्छुकांनी थेट महाविकास आघाडीच्या तंबूत प्रवेश केला होता.

Jagdish Pansare

Marathwada Politics : राजकारणात ध्येय, धोरणं, विचार अन् पक्ष निष्ठा याला कायम महत्व असते. परंतु सत्ता आणि पदासाठी या गोष्टींना आता फारसे महत्व उरले नाही, असेच चित्र सध्या पहायला मिळते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती आणि महाविकास आघाडीमुळे अनेक इच्छुकांची कोंडी झाली होती. मित्र पक्षाला मतदारसंघ सुटणार हे स्पष्ट होताच अनेकांनी चक्क विरोधी पक्षांकडे धाव घेत उमेदवारी पदरात पाडून घेतली.

विशेष म्हणजे याला त्या त्या पक्षाच्या वरिष्ठांनीही साथ दिली. पण इप्सित साध्य न झालेले सगळे पराभूत आता पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत. (Mahavikas Aghadi) हे चित्र बघितल्यावर यालाच म्हणतात का निष्ठा? असा प्रश्न निश्चितच पडतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, सिल्लोड या तीन मतदारसंघात उमेदवारीसाठी युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप पक्षाच्या इच्छुकांनी थेट महाविकास आघाडीच्या तंबूत प्रवेश केला होता. मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी आपल्याच सरकारवर नाराजी व्यक्त करत निलंबनाची कारवाई ओढावून घेतली.

ही कारवाई होऊन काही दिवस उलटत नाही तोच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सतीश चव्हाण यांना गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली. पण नशिबी पराभव आला आणि गेल्या महिन्यात चव्हाण पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत परतले. अवघ्या दोन महिन्यातील या घडामोडी पाहता राजकीय पक्षांचा विरोध म्हणजे केवळ धुळफेक असते हे पटते. राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shivsena UBT) वैजापूर आणि सिल्लोड मतदारसंघात हाच प्रयोग केला.

वैजापूरमध्ये माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांना ऐनवेळी डावलून भाजपमधून आयात केलेल्या दिनेश परदेशी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या चिकटगावकरांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि शिंदेंच्या रमेश बोरनारे यांना रसद पुरवली. परिणामी परदेशी यांचा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम झाला आणि ते पराभूत झाले. आता मशाल हाती घेऊन उपयोग नाही हे ओळखून पुन्हा भाजपमध्ये जात स्थानिक पातळीवरचे राजकारण सोयीचे करण्याचा परदेशी यांनी प्रयत्न केला आहे.

तिकडे सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपने लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सुरेश बनकर यांना उद्धवसेनेत पाठवले. सत्तार यांच्या गद्दारीचा बदला घेण्यासाठी ठाकरेंनी मग बनकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. 2019 मध्ये हाच प्रयोग अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत भाजपने केला होता. सत्तारांना विरोध झाल्यामुळे युती असल्याने सत्तार यांना थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करायला लावला आणि हक्काचा मतदारसंघही सोडला.

सत्तारांचे नशिब बलवत्तर म्हणून ते निवडून आले. सुरेश बनकर मात्र याबाबतीत थोडे कमनशिबी ठरले. अब्दुल सत्तार यांना धक्का देण्यात भाजप यशस्वी ठरली असली तरी सुरेश बनकर यांच्या कपाळी चौथ्यांदा निवडणूक लढवूनही गुलाल काही लागलाच नाही. 2420 मतांनी अब्दुल सत्तार यांचा बिस्मिल्ला होता होता राहिला. निसटता विजय मिळाल्याने सत्तार यांचे विमान जमीनीवर आले आहे. तर बनकर यांनी त्यांच्यावर सोपवलेली मोहिम पार पाडल्यामुळे भाजपनेही त्यांना माघारी बोलावले. विधानसभा निवडणुकीत झालेला राजकीय पक्षांचा हा खेळ सर्वसामान्य मतदारांच्या मात्र पचनी पडलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT