Congress News : लातूरचे खासदार डाॅ. शिवाजी काळगे यांनी शहराचे आमदार अमित देशमुख यांची बाभळगावच्या गढीवर जाऊन भेट घेतली. 2024 मध्ये मतदारांनी महाविकास आघाडीला साथ देत काळगे यांना निवडून दिले. भाजपसाठी हा मोठा धक्का होता. परंतु दोन वर्ष उलटून गेली तरी लातूर जिल्ह्याच्या विकासकामांना म्हणावा तसा वेग आलेला नाही. अनेक प्रकल्प, कामे रखडली आहेत.
या पार्श्वभूमीवर डाॅ. शिवाजी काळगे यांनी गढी गाठत अमित देशमुख यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. यात प्रामुख्याने लातूर शहर आणि जिल्ह्यातील उद्योग व्यापार वाढिला आणि कृषी विकासाला चालना मिळण्यासाठी येथून उड्डाण योजनेअंतर्गत प्रवासी विमान सेवा तसेच कृषी मालवाहतुकीसाठी कार्गो विमानसेवा सुरू होणे आवश्यक असल्यावर दोघांमध्ये एकमत झाले.
लातूर विमानतळ एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडे वर्ग झाल्यास धावपट्टी विस्तार, टर्मिनस बिल्डिंग, नाईट लँडिंगसह सुरक्षेच्या अद्यावत सुविधा येथे निर्माण होऊ शकतील. फळे, भाजीपाला व इतर कृषी उत्पादने आणि त्यावर प्रक्रिया केलेली उत्पादने, देशांतर्गत मोठ्या बाजारपेठेत व देशाबाहेर सहजगत्या निर्यात करणे शक्य होईल. लातूर-कलबुर्गी, लातूर-नांदेड, आणि लातूररोड-बोधन नवीन रेल्वे मार्ग बांधण्यासाठी सर्व्हे झालेले आहेत, त्यामुळे या रेल्वे मार्गांना मंजुरी मिळून त्या कामांची लवकरात लवकर सुरुवात होणे गरजेचे आहे.
लातूर येथून उत्तर भारतात जाण्यासाठी नवीन रेल्वे गाड्या सुरू करणे गरजेचे आहे. लातूर येथे रेल्वे कोच फॅक्टरी उभारली असली तरी तेथे पूर्ण क्षमतेने काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही, ते काम सुरू करून स्थानिकांना त्यात रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच या कोच फॅक्टरीला आवश्यक असणारे साहित्य पुरवण्यासाठी येथे पूरक उद्योग उभारणीला चालना देणे, तसे धोरण ठरवून घेणे गरजेचे आहे.
लातूर-कुर्डूवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करून घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर, लातूर शहरातील गरुड चौक ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक इथपर्यंतचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मिसिंग लिंक म्हणून बांधून घेणे गरजेचे आहे. लातूर शहरासाठीच्या नवीन बाह्यवळण रस्त्याचे बांधकाम राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत होणे गरजेचे आहे, यावरही चर्चा झाली. लातूरसह मराठवाड्यातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी काही अतिरिक्त सुविधा उभारणे गरजेचे आहे.
मराठवाडा वॉटर ग्रीडमधून प्राधान्याने लातूरसाठी पाणी उपलब्ध करून घेणे आता आवश्यक बनले आहे. शंभर खाटांची क्षमता असलेल्या लातूर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम आता सुरू होत आहे, या रुग्णालयाचा विस्तार 400 ते 500 खाटांपर्यंत करता यावा असे नियोजन आताच करणे आवश्यक आहे. अतिवृष्टीने खराब झालेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर करून घेणे गरजेचे असून लातूर शहरातील विलासराव देशमुख महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून घेऊन या कामाला गती देणे गरजेचे आहे.
या व इतर प्रमुख विषयासह लातूर शहर व जिल्ह्यातील अनेक प्रमुख प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने या वेळी चर्चा झाली. भारतीय संसद आणि महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान या सर्व महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणून त्यासाठी निधी मंजूर करून घेण्याच्या दृष्टीने यावेळी सविस्तरपणाने दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.