Chhatrapati Sambhajinagar News : जिल्ह्याच्या राजकारणात कायम एकमेकांना पाण्यात पाहणारे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) (Shivsena UBT News) नेते, लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना महिनाभरात दुसऱ्यांदा एकमेकांना पेढा भरवण्याची संधी मिळाली. दोन आठवड्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी खैरे यांना जाहीर झाली. तेव्हा नाराज असलेल्या दानवेंनी खैरे यांच्या घरी जाऊन त्यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल शुभेच्छा देत पेढा भरवला होता. या भेटीची चर्चा तेव्हा जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या राजकारणात चवीने सुरू होती.
उमेदवारी मिळाल्याबद्दल पक्षातील कट्टर विरोधकाने भरवलेल्या पेढ्याची गोडी अजून संपत नाही, तोच खैरे-दानवे यांना पुन्हा ऐकमेकांना पेढा भरवण्याचा योग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एका निर्णयाने आला. तो निर्णय म्हणजे अंबादास दानवे यांची शिवसेना नेतेपदी झालेली बढती. दानवे यांच्यासाठी शिवसेनेतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते.
चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना दानवेंचा विरोध डावलून देण्यात आलेली उमेदवारी म्हणजे शेवटची संधी आहे, हे दानवे यांच्या नेतेपदी झालेल्या नियुक्तीवरून स्पष्ट झाले आहे. आता जिल्हा आणि मराठवाड्याच्या राजकारणात अंबादास दानवे हेच दादा असणार हेही उद्धव ठाकरे यांनी या नियुक्तीच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. काल मुंबईत शिवसेना नेतेपदी नियुक्ती केल्याबद्दल अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्यानंतर आज सकाळी सहा वाजता दानवे यांचे संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी दानवे समर्थकांनी केली होती. विमानतळापासून क्रांती चौकापर्यंत वाहन रॅलीचे आयोजन आणि सत्कार असा कार्यक्रम होणार होता. परंतु अचानक तो रद्द करण्यात आला. त्यामुळे सकाळी विमानतळावर शिवसेनेच्या पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व शिवसैनिकांच्या स्वागताचा स्वीकार करत दानवे यांनी थेट चंद्रकांत खैरे यांचे डेक्कन येथील निवासस्थान गाठले.
राजकारणात मी दानवेंचा गुरू आणि ते माझे शिष्य असल्याचे खैरे वारंवार सांगतात. शिवसेना नेते पदावर निवड झाल्यानंतर दानवे यांनीही खैरे यांना गुरू मानत त्यांची भेट घेतली आणि पुढील कार्यासाठी आशीर्वादही मागितला. दोघांनी एकमेकांना आलिंगन देत शाल, पुष्पगुच्छ देत पेढा भरवला. हे दृश्य पाहणाऱ्या दोघांच्याही समर्थकांना आनंद झाला नसेल तर नवलच.
उद्धव ठाकरे यांनी मात्र दानवे यांच्या नियुक्तीतून एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे काम केले आहे. नाराज दानवे यांना आता खैरेंच्या विजयासाठी कामाला लावले, तर नेतेपदी बढती देत दानवे यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम लावला. खैरे-दानवे यांच्यातील ही दिलजमाई महाविकास आघाडी आणि विशेषतः ठाकरे गटासाठी शुभ संकेत मानले जात आहे.
(Edited By - Rajanand More)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.