Ajit Pawar and Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News : माझ्या काळात बीडचा विकास, आता सुरू असलेली बदनामी थांबवा; धनंजय मुंडेंचे अजितदादांना साकडे!

Dhananjay Munde defends against defamation and highlights significant developments in Beed district during his 4-year tenure as the Guardian Minister : बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून जातीय वादाचे विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरले जात आहे. याचा परिणाम जनतेपासून ते अगदी प्रशासनावर सुध्दा झाला. जिल्हा प्रशासनात सुध्दा उभी फूट पडली आहे

Jagdish Pansare

Beed News : खोट्या माहितीच्या आधारावर राज्यभरात बीड जिल्ह्याची बदनामी काही लोकांकडून केली जात आहे. जातीय वादाचे विष पेरले जात असल्याने प्रशासनामध्ये उभी फूट पडली आहे. माझ्या चार वर्षाच्या पालकमंत्री पदाच्या काळात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला आहे, परंतु आता बीडची सुरू असलेली बदनामी थांबवा, अशी मागणी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

गेल्या दीड महिन्यापासून बीड जिल्हा राज्यात व देशात चर्चेचा विषय ठरत आहे. पण ही चर्चा चांगल्या अर्थाने नाही, तर ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, दहशत, गुंडगिरी, जातीय वाद आणि त्यातून होणाऱ्या हत्या यामुळे होताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जबादादीर सोपवण्यात आली. दरम्यान, विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना धनंजय मुंडे यांनी आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या जिल्ह्यातील विकास कामांची यादी बैठकीत मांडत प्रत्युत्तर दिले.

मागच्या पाच पैकी चार वर्षे मी बीड (Beed) जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यात साधारण दोन ते अडीच वर्षे ही कोविड मध्ये गेली. त्या काळात रुग्णांना तातडीचे योग्य उपचार मिळवून देणे तसेच लोकांचे प्राण वाचवणे, आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणे ही कामे प्राधान्याने करत कोविडच्या काळामध्ये जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आले. अनेक कोविड सेंटर, ऑक्सिजन प्लांट, नवीन रुग्णवाहिका खरेदी, विविध वैद्यकीय साहित्य अशा आरोग्य यंत्रणांना बळकटी देणाऱ्या बाबींवरती मोठ्या प्रमाणात जिल्हा नियोजन समितीचा निधी त्याकाळी खर्च केला गेला.

2024 वर्षाचे अतिवृष्टी अनुदान मंजूर होऊन आलेले आहे, त्याचे वितरण लवकर पूर्ण केले जावे अशी विनंती आहे. (Dhananjay Munde) माझ्या कार्यकाळात जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे 1100 किमी रस्त्यांच्या विकासाचे काम पूर्ण झाले. पंकजाताई मुंडे यांच्या पालकमंत्री कार्यकाळात मंजूर होऊन सुरू झालेले जिल्हा परिषद इमारत बांधकाम माझ्या कार्यकाळात पूर्णत्वास गेले. पंकजाताई मुंडे यांचे पाच वर्ष व त्यापुढे मला मिळालेला 4 वर्षांचा कालावधी यात आम्ही सर्वसमावेशक विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी कार्यालय इमारत ,मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परळी ते बीड या महत्त्वाच्या रस्ता रुंदीकरणचे काम सुरू आहे. यांसह जिल्ह्यात न्यायलये, प्रशासकीय इमारती, विश्रामगृह, शासकीय रुग्णालयांच्या दर्जोन्नती व बांधकाम अशा अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांची कामे या काळात केली गेली. तर अनेक कामे सध्या प्रगती पथावर आहेत. कृषी भवन, महिला व बालविकास भवन, सीताफळ इस्टेट अशी अनेक मंजूर असलेली कामे आता अजितदादांच्या नेतृत्वात पूर्णत्वास जातील, अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

बीड जिल्हा पोलिस दलास आवश्यक 73 नवीन वाहने, 113 मोटार सायकल या बाबी नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात आल्या. अशी अनेक सकारात्मक कामे करताना सर्व तालुक्यांना समान निधी देण्याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली. ऐकीव आणि अर्धवट माहितीच्या आधारे नियोजन समितीच्या कामकाजावर मागील काही दिवसात करण्यात आलेल्या निराधार आरोपांना पुरावण्यांसह खोडून काढण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून केले जाईल,असे सांगत धनंजय मुंडे यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेले आरोप खोडण्याचा प्रयत्न केला.

जातीय वादाचे विष पेरले जात आहे

बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून जातीय वादाचे विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरले जात आहे. याचा परिणाम जनतेपासून ते अगदी प्रशासनावर सुध्दा झालेला दिसून येत असून, जिल्हा प्रशासनात सुध्दा उभी फूट पडली आहे, हे नाकारता येणार नाही. कोण कधी कुठल्या अधिकाऱ्याचे नाव आणि जात काढून काय आरोप करतील ते सांगता येत नाही. त्यामुळे शिपाई ते जिल्हाधिकारी सर्वच अधिकारी, कर्मचारी यांच्यावर भीती व दडपणाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आपल्या पदांना व कामांना हे अधिकारी कसा न्याय देऊ शकतील?

त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांची एक विशिष्ट रणनीती ठरवून त्यांना भयमुक्त वातावरण तयार करून देण्याबाबत तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान काही अफवा पसरवून, अर्धवट माहितीच्या आधारे मीडिया ट्रायल चालवून बीड जिल्ह्याची नको ती प्रतिमा बाहेर प्रसिद्ध केली जात आहे. सबंध जिल्ह्याची नाहक बदनामी होत आहे. सामाजिक सलोखा अबाधित रहावा तसेच जिल्ह्याची बदनामी थांबावी, याबाबतही ठोस उपाययोजना करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT