Suresh Kute, Archana Kute  Sarkarnama
मराठवाडा

Suresh Kute : इनसाइड स्टोरी, द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंना घेरण्यासाठी भाजपने असं टाकलं जाळं

Datta Deshmukh

Beed Political News : ज्ञानराधा मल्टिस्टेटमधील ठेवी देण्यासाठी आर्थिक अडचणीत आलेल्या द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे व या समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी भाजपने त्यांना आर्थिक अडचणीतून मार्ग तर काढूनच दिला. पण, भाजपमध्ये घेण्यासाठी त्यांच्यावरही ‘ईडी’,‘सीबीआय’, ‘इन्कम टॅक्स’ या मात्रा वापरण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्योग क्षेत्रातील मराठवाड्यातील बडे प्रस्थ असलेले सुरेश कुटे राजकीय परिघापासून कायम दूर होते. त्यांच्या पत्नी व या समूहाच्या कार्यकारी संचालिका अर्चना कुटे व्यवसायासह सामाजिक कामातही सक्रिय असतात. दरम्यान, महिनाभरापूर्वी त्यांच्या समूहाची आयकर विभागाने नियमित तपासणी सुरू केली.

त्यामुळे सुरेश कुटे अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेटमधून पैसे काढून घेण्यासाठी ठेवीदारांची झुंबड उडाली. ५० शाखा व सहा लाख ग्राहक असलेल्या ज्ञानराधाचे बाहेर कर्ज असले तरी वसुलीची मुदत नसल्यामुळे वसुली होऊ शकत नव्हती. त्यामुळे ज्ञानराधा मल्टिस्टेटची आर्थिक घडी बसविण्यासाठी त्यांना त्यांच्या द कुटे समूहातील काही कंपन्यांची हिस्सेदारी विकण्याशिवाय पर्याय नव्हता.

सुरेश कुटे व अर्चना कुटे बड्या उद्योगपतींशी बोलणी करत होते. परंतु, यांची अडचण व गरज पाहून समोरच्या उद्योगपतींकडून हिस्सेदारी पाडून मागितली जात होती. याच वेळी त्यांना दुबईच्या रॉयल फॅमिलीकडून या ग्रुपमधील खाद्यतेल, खोबरेल तेल, डेअरी आदी कंपन्यांची भागीदारी खरेदीचा प्रस्ताव आला. रॉयल फॅमिलीची देशात गुंतवणूक करण्यासाठी प्रधानमंत्री कार्यालयात स्वतंत्र विभाग असल्याने कुटेंना या ठिकाणी संपर्क करावा लागला. (Marathwada Politics )

दरम्यानच्याच काळात सोशल मीडियावरून सुरेश कुटेंच्या सपोर्टसाठी मोहीम सुरू होती. सरकारी यंत्रणा व भाजपच्या नजरेत ही मोहीम आली. त्यामुळे कुटे आपल्यासाठी भविष्यात महत्त्वाचा ‘चेहरा व मोहरा’ असल्याचे भाजपने हेरले व त्यांना पक्षप्रवेशाची गळ घातली. मात्र, राजकारण हा पिंड नसल्याने सुरेश कुटे व अर्चना कुटे राजकारणात यायला तयार नव्हत्या.

मात्र, हजारो कोटींचा कारभार, मराठा चेहरा, पत्नी अर्चना कुटे सामाजिक कार्यात सहभागी असल्याने भविष्यात त्यांचा गरजेनुसार फायदा होऊ शकतो हे भाजपमधील धुरीणांनी हेरले. पंकजा मुंडे व भाजप नेत्यांचे संबंध तर अलीकडे ताणलेले आहेतच.

शिवाय मुंडेंकडूनही वारंवार आव्हान दिले जात असल्याने त्यांनाही या प्रवेशाच्या माध्यमातून भाजपला ‘मेसेज’ द्यायचा होता. म्हणून कुटेंनी भाजपमध्ये यायलाच हवे यासाठी मग नेहमीप्रमाणे ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या विभागांनी आपापले कर्तव्य पार पाडले. त्यामुळे कुटेंचाही नाईलाज झाला. भाजपनेही अर्चना कुटेंना प्रवेश दिलाय हे यात महत्त्वाचे आहे.

कुटेंच्या प्रवेशामुळे भविष्यात भाजपला अधिक फायदा होणार का कुटेंचे योग येणार हे काळच ठरवेल. मात्र, त्यांचे उद्योग, बँकांच्या शाखा यामुळे आता तरी भाजपला फायदा आहेच. आता त्यांच्या ज्ञानराधामधील ठेवी देण्यासाठी आर्थिक तजवीज झाली की त्यांची इमेजदेखील क्लीअरच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT