Babajani Durani, Suresh Warpudkar News Parbhani Sarkarnama
मराठवाडा

Baba Jani Durani News : सुरेश वरपूडकर भाजपमध्ये, तर अजितदादांनी वेटिंगवर ठेवलेले बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर!

Suresh Varpadukar joins BJP, Babajani Durrani, sidelined by Ajit Pawar, is likely to join Congress. : दुर्राणी यांचे परभणी जिल्ह्यात चांगले जनसंपर्काचे जाळे आहे. अल्पसंख्याक समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, काँग्रेसला त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची नितांत गरज आहे.

Jagdish Pansare

गणेश पांडे

Parbhani Politics : परभणी जिल्ह्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा पक्षप्रेवश मुंबईत होत आहे. काही दिवसापुर्वी राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर आता अजितदादांनी वेटिंगवर ठेवलेले माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे काँग्रेसच्या वाटेवर निघाले आहेत. हा संभाव्य प्रवेश झाला तर काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी दुर्राणी भरून काढण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durani) यांची राजकीय दिशा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार असतानाही, पक्षाकडून स्पष्ट तारीख मिळत नसल्यामुळे त्यांचा प्रवेश अनिश्चित आहे. त्यामुळे आता ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या विचारात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दुर्राणी हे सक्रियपणे राजकीय हालचाली करत आहेत. सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत दिले होते.

मात्र, प्रवेशाची ठोस तारीख न ठरल्यामुळे आणि पक्षांतर्गत गोंधळामुळे हा प्रवेश अद्यापही रखडलेला आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपुडकर (Suresh Warpudkar) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाची परभणी जिल्ह्यातील नेतृत्व पातळीवरील स्थिती डळमळीत झाली आहे. नेतृत्वाच्या या पोकळीमुळे काँग्रेसमध्ये नव्या चेहर्‍याच्या शोधाला वेग आला आहे.अशा स्थितीत बाबाजानी दुर्राणी यांचे नाव पुढे येत आहे.

दुर्राणी यांचे परभणी जिल्ह्यात चांगले जनसंपर्काचे जाळे आहे. अल्पसंख्याक समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, काँग्रेसला त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची नितांत गरज आहे. त्यामुळे आगामी काळात ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या तरी दुर्रानी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून, काँग्रेसकडून सकारात्मक संकेत मिळाल्यास त्यांचा प्रवेश लवकरच जाहीर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासाठी परभणीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असून, इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे. माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे तसेच अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे हे या पदासाठी इच्छुक असल्याचे राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे. माजी जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या भाजप प्रवेशानंतर परभणी जिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.

पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून नवे जिल्हाध्यक्ष लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, त्यासाठी दिल्ली आणि मुंबई दरम्यान हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील हे अनुभवी व लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेले नेते असून, पक्षाच्या जुन्या पिढीतील विश्वासार्ह चेहरा मानले जातात. दुसरीकडे, बाळासाहेब देशमुख यांचेही जिल्हा पातळीवर चांगले नेटवर्क आहे. भगवानराव वाघमारे हे शहर पातळीवरील प्रभावी नेते असून, अनुसूचित जातीतील प्रतिनिधित्व म्हणून डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांचे नावही पक्षश्रेष्ठींना आकर्षित करत आहे.

स्थानिक पातळीवरील गट-तट, जाती-धर्माचे समीकरण आणि पक्षाला आगामी निवडणुकींमध्ये चालना मिळवून देणारी व्यक्ती हाच निवडीचा प्रमुख निकष ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस परभणीत स्थिर नेतृत्व कोणाच्या हाती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका बाजूला बाबाजानी दुर्रानींच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाध्यक्षपदासाठीची चुरस या दोन्ही घडामोडी काँग्रेससाठी निर्णायक ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT