BJP Politics Sarkarnama
मराठवाडा

BJP Political News : ...अशी होतेय भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची दुहेरी अडचण!

Maharashtra Politics : बाहेरून आलेल्या नेत्यांना प्रवेश देण्यापर्यंत कार्यकर्त्यांनी सहनही केले. मात्र...

Prasad Shivaji Joshi

Parbhani News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असल्याने भारतीय जनता पक्षामध्ये शिस्तीला मोठे महत्व दिले जाते.पक्षनेतृत्वाने दिलेला आदेशाचा निमूटपणे पालन करणे कार्यकर्त्यांना बंधनकारक असते.मात्र, अलिकडे पक्ष पूर्वीसारखा राहिला नाही अशी भावना अनेक कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवतात.विशेषतः अन्य पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश दिलेल्या नेत्यांची संख्या पाहता पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची भावना अडगळीत पडल्यासारखी आहे.

बाहेरून आलेल्या नेत्यांना प्रवेश देण्यापर्यंत कार्यकर्त्यांनी सहनही केले. मात्र, पक्षप्रवेश आणि लगेचच उमेदवारी देण्याच्या पॅटर्नमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे असे असतानाच पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पदाधिकाऱ्याना पक्षप्रवेश देऊन थेट लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने तर पक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हतबल होत असल्याचे दिसून येत आहे.

दुहेरी अडचण...

महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरु आहेत. विद्यमान खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्याविरोधात निवडणुक लढवण्यासाठी पक्षातील नेते इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील वरिष्ठ पदाधिकारी असलेल्या नेत्यास पक्षात प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत.

संबंधित नेत्याचा मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याचे सुध्दा कळते. मात्र, पक्षनेतृत्वाच्या या धोरणामुळे पक्षात वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दुहेरी अडचण झाली आहे. एकीकडे बाहेरून आलेल्यांना पक्षप्रवेश देऊन थेट उमेदवारी देत आहेत तर दुसरीकडे जे राजकारणातच नाहीत त्यांनाही पक्षप्रवेश देऊन उमेदवारी दिली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोस्टकार्ड थिअरी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक व कार्यकर्ते पोस्टकार्ड थिअरी सांगतात. म्हणजे संघाचे पूर्णवेळ काम करणारे प्रचारक हे पोस्टकार्डप्रमाणे असून त्याच्यावर पत्ता संघाचे नेतृत्व लिहिते. संघ जो पत्ता लिहिल, त्या ठिकाणी जाऊन काम करायचे. या थिअरीनुसार संघाचे अनेक प्रचारक भारतीय जनता पक्षात (BJP) काम करतात. प्रामुख्याने त्याना संघटनमंत्री (संघटन सरचिटणीस) या पदावर नियुक्ती दिली जाते. हे काम पडद्यामागे राहून केले जात असल्यामुळे संघटनमंत्री कधीही प्रसारमाध्यमांशी बोलताना दिसत नाहीत.

सत्तेच्या जवळ असूनही प्रकाशझोतात न येण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्याविषयी संघटनेत आदर असायचा. मात्र संघातील पदाधिकारी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे प्रकार होत नव्हते.

संघ हा प्लॅटफॉर्म ?

संघातून थेट निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश देण्याची शक्यता असल्याने संघ हा राजकारणात प्रवेश करण्याचा सर्वात सुरक्षित आणि वेगवान प्लॅटफॉर्म बनण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT