Shivsena Sarkarnama
मराठवाडा

Shivsena v/s Shivsena UBT : ठाकरे की आनंद दिघे ? छत्रपती संभाजीनगरात दोन्ही शिवसेना भिडल्या..

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray's party opposes Anand Dighe's memorial : राज्यातील लोकसभा आणि आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष भडकू लागला आहे.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीतील जिल्ह्यातील महायुतीच्या यशाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना जोशात आहे. यातून संजय शिरसाट आमदार असलेल्या पश्चिम विधानसभा मतदार संघातील वेदांतनगर भागात धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न झाला. त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध करत तिथे बाळासाहेब ठाकरे याचे छायाचित्र आणि भगवा झेंडा रोवून हा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकारामुळे शहरात शिवसेना विरुद्ध शिवसेना एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसू लागले आहे.

राज्यात अडीच वर्षापुर्वी शिवसेना पक्षात फूट पडली. तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे चाळीस आमदार बाहेर पडले. भाजपसोबत जात त्यांनी राज्यात सत्ता आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदही मिळवले. शिवसेनेतील ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी फूट होती. या फुटीनंतर राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरीने दिवंगत आनंद दिघे यांनाही आणण्याचा प्रयत्न झाला.

अर्थात आनंद दिघे (Anand Dighe) यांचे ठाणे आणि एकूणच शिवसेनेच्या जडणघडणीत मोठे योगदान होते हे नाकारता येणार नाही. आनंद दिघे हे त्यांच्या कर्तृत्वाने मोठे आहेतच, पण त्यांची तुलना थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी करून नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का? तो ही शिवसेनेत फूट पडल्यानंतर अशी शंका उपस्थितीत केली जात आहे. धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागातून याला पुष्टीही मिळते.

राज्यातील लोकसभा आणि आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष भडकू लागला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिल्ह्यातील सर्व नऊ जागा जिंकल्या. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना शहर आणि जिल्ह्यातही सरस ठरली.

शहरातील औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी भाजपमधून आयात केलेल्या राजू शिंदे यांना उमेदवारी दिली. राजू शिंदे यांनी पुर्ण ताकद पणाला लावली, पण शिरसाट यांनी विजयाचा चौकार लगावलाच. तशी शिरसाट-राजू शिंदे यांच्यात पहिल्यापासून राजकीय वाद आहेत. 2019 मध्ये युती असतांना राजू शिंदे यांनी बंडखोरी करत संजय शिरसाट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

पण तेव्हाही शिरसाट यांनी त्यांचा चाळीस हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. 2024 मध्ये पुन्हा शिरसाट-शिंदे एकमेकांच्या विरोधात लढले. निवडणुकीतील पराभवानंतर या दोघांच्या समर्थकांमध्ये धुसफूस सुरुच आहे.

पश्चिम मतदार संघातील वेदांतनगर येथील एका चौकात शिवसेना शिंदे गटाने धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न केला. याची कुणकूण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना लागली आणि त्यांनी तिथे धाव घेत हा प्रयत्न हाणून पाडला.

एवढेच नाही तर तिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायचित्र आणि भगवा ध्वज रोवत तेथील बांधकाम साहित्य महापालिकेच्या पथकाला घेऊन जाण्यास सांगितले. आनंद दिघे यांना आमचा विरोध नाही, त्यांचे स्मारक बांधायचे असेल तर दुसऱ्या जागेवर करा, अशी भूमिका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी घेतली.

राजू शिंदे, राजू वैद्य, नंदकुमार घोडेले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थितीत होते. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका पाहता शहरात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यावरून राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेदांतनगरातील या प्रकरणाने त्यांची सुरुवात झाली, अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT