
Mumbai News : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले. बहुमत मिळाल्याने येत्या काळात राज्यात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणार आहे.
त्यातच आता महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खातेवाटपावरून चुरस पहावयास मिळत असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणाऱ्या नऊ खात्याची संभाव्य यादी समोर आल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल गेल्या शनिवारी लागला. निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप नवीन सरकार स्थापन झाले नाही. तर दुसरीकडे भाजपने (Bjp) घटक पक्षांना मुख्यमंत्रिपद देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आता महायुतीतच खाती वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने (Shivsena) 12 मंत्रिपदांवर दावा केला आहे. त्यासोबतच विधान परिषदेचे सभापती पद मिळावे, यासाठीही शिंदे आग्रही असल्याचे समजते. शिंदे यांनी मागणी केलेल्या मंत्रिपदामध्ये गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम या महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे
त्यातच येत्या काळात भाजपकडून त्यांना सोडण्यात येणाऱ्या खात्याची संभाव्य यादी समोर आली आहे. भाजपने शिवसेनेला गृह खाते सोडण्यास नकार दर्शवला आहे. शिंदें गटाच्या वाट्याला मंत्रिमंडळातील नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, उद्योग, उच्च आणि तंत्रशिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क, पीडब्ल्यूडी आणि रोजगार हमी ही खाती येणार असल्याचं सांगितले जात आहे. शिंदे गटाच्या वाट्याला तूर्तास फक्त 9 खाते मिळणार आहेत.
भाजप गृहमंत्री आणि ओबीसी मंत्रालय स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती सूत्रांने दिली. त्यामुळे मागणी करूनही शिंदे गटाच्या वाट्याला गृह खाते येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपकडून देण्यात आलेल्या खात्यावर शिवसेनेचे समाधान होणार का ? याची चर्चा रंगली आहे. महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांची रविवारी किंवा सोमवारी बैठक होणार असून त्यामध्ये खाते वाटपावर सविस्तर चर्चा होणार आहे.
दरम्यान, गुरुवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 मंत्रिपदांवर दावा केला आहे. त्या मंत्रिपदामध्ये गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम या महत्त्वाच्या खात्यांसह विधान परिषदेचे सभापतीपद देण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता येत्या काळात भाजपकडून याबाबत काय निर्णय घेतला जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.