Shivsena UBT On Water Issues Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT On Water Issues : 'लबाडांनो पाणी द्या'म्हणत उद्धवसेना सरकारवर तुटून पडणार! पण अंतर्गत गटबाजीचे आंदोलनाला ग्रहण

Shiv Sena Water Issue Protest: आगामी महापालिका निवडणुकीत हाच मुद्दा प्रमुख हत्यार म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वापरण्याचा निर्णय पक्षपातळीवर घेण्यात आला आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News: संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर आक्रमक होत सरकारवर तुटून पडण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. काल या आंदोलनाच्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे गैरहजर होते. पुर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते बाहेरगावी असल्याचे सांगितले गेले. मात्र गेल्या काही दिवसांपासून खैरे-दानवे या दोघांमधील वाद कमालीचा वाढल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकही आमदार निवडून आला नाही, पक्षातील बहुतांश पदाधिकारी, माजी महापौर, शिवसैनिक पक्ष सोडून गेले. विधानसभा निवडणुकीत आयात केलेलेही पळाले, या पार्श्वभूमीवर (Shivsena) शिवसेनेत प्रचंड अंतर्गत नाराजी आणि गटबाजी आहे. ती कालच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. छत्रपती संभाजीनगरकरांना दहा ते बारा दिवसांना पाणी मिळते.

आगामी महापालिका निवडणुकीत हाच मुद्दा प्रमुख हत्यार म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वापरण्याचा निर्णय पक्षपातळीवर घेण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पुढील महिन्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याने तब्बल महिनाभर या मुद्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे. याची संकल्पना आणि नियोजनावर (Ambadas Danve) अंबादास दानवे यांची छाप असून खैरे या सगळ्यापासून दूर आहेत.

कालच्या मेळाव्याला गैरहजर राहून खैरे यांनी आपली नाराजी कृतीतूनही दाखवून दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. आता खैरे यांच्या नाराजीचा फटका या आंदोलनाला बसतो? की खैरेंशिवाय आंदोलन यशस्वी करून अंबादास दानवे त्यांचा पत्ता कायमचा कट करतात? हे महिनाभरात दिसून येईल. कालच्या मेळाव्यात अंबादास दानवे यांनी आंदोलनाची संपूर्ण रुपरेषा स्पष्ट केली.

'लबाडांनो पाणी द्या' या घोषवाक्याखाली शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण संभाजीनगरात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा अंबादास दानवे यांनी केली. संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाबाबत महिनाभर आंदोलन उभारून शासन आणि प्रशासनाला जाब विचारणार, असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्ये मे महिन्यात संभाजीनगर महानगरपालिकेच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता.

भाजपाची सत्ता आल्यावर सहा महिन्यात दररोज पाणी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. दिले आज युतीची सत्ता येऊन तीन वर्ष झाले तरीही शहराला 10 ते 12 दिवसाला पाणी मिळत आहे. हंडा मोर्चाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप सर्वसमोर ऐकवत फडणवीस यांच्या आश्वासनाचा भांडाफोड अंबादास दानवे यांनी केला. तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मंत्री अतुल सावे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी बजरंग चौक येथे केलेल्या भाषणात दिलेल्या आश्वासनाचीही आठवण करून दिली.

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख प्रवेशद्वारांवर आणि महत्वाच्या ठिकाणी रिकाम्या हंड्यांचे तोरण लावून सरकारचे लक्ष वेधणार असून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांमध्ये तीन दिवस ‘कट्टा बैठका’ आयोजित केल्या जाणार आहेत. या बैठकांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. शहरातील 10 झोनमध्ये प्रत्येक प्रभागातील पाणी समस्येबाबत महिला आघाडीच्या माध्यमातून संबंधित विभागीय कार्यालयांना निवेदन सादर केले जाणार आहे.

नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीम व्यापक स्तरावर राबवून 25 एप्रिल रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले जाणार आहे. 26 एप्रिल रोजी शहरात सायकल रॅली काढण्यात येणार असून यामध्ये युवावर्ग मोठ्या संख्येने सहभागी करून घेतला जाणार आहे. युवासेनेच्या माध्यमातून शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाईल आणि त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल.

शहरातील 64 पाण्याच्या टाक्यांवर महिला आघाडीच्या पदाधिकारी हळद कुंकू लावून पूजनाचे प्रतीकात्मक आंदोलन करणार आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि महानगरपालिका आयुक्तांना एक लाख ईमेल पाठवून या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष केंद्रित करणार, असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. महिनाभराच्या आंदोलनाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अथवा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेवटी एक मोठा आणि निर्णायक भव्य मोर्चा काढला जाणार आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT