Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं बीडवर विशेष लक्ष, शिवसेनेत मोठे फेरबदल; आता असणार...

Beed Political News : एकेकाळी जिल्ह्यात युतीत शिवसेना मोठा पक्ष होता...

Datta Deshmukh

Beed News : लोकसभा निवडणुका अवघ्या 4 ते 5 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचं आव्हान परतवून लावताना भाजपविरोधात मैदान मारण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच बंडानंतर काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्याकडे पुन्हा एकदा ठाकरेंनी स्वत : लक्ष घातले असल्याचे दिसून येत आहे. कारण शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संघटनेत मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीच्या पातळीवर मोठे फेरबदल केले आहे. यात नव्या संघटनेत आता तीन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हाप्रमुखांच्या अखत्यारित आता दोन विधानसभा मतदारसंघ असतील. गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते व रत्नाकर शिंदे या तिघांची जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली.

एकेकाळी जिल्ह्यात युतीत शिवसेना मोठा पक्ष होता. युतीच्या सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा होत्या. तेव्हा रेणापूर हा मतदार संघ जिल्ह्यात होता. त्या काळी भाजपला एक तर शिवसेनेला सहा जागा होत्या. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व बहरत असताना शिवसेनेची जिल्ह्यातील एकेक जागा कमी करून त्या जागेवर राज्यातील अन्य जागा शिवसेनेला दिली जात होती. सरतेशेवटी सहापैकी केवळ बीडची एकमेव विधानसभेची जागा शिवसेनेकडे तर उर्वरित पाच जागा भाजप (BJP) लढवत होत्या.

दरम्यान, आता राजकीय समीकरणे बदलली आहेत.मागच्या काही वर्षांपासून शिवसेनेला दोन जिल्हा प्रमुख असत. शिवसेना जिल्हाप्रमुखांवर आरोप आणि गंभीर गुन्ह्यांत सहभागाची मालिका काही वर्षांपासून सुरूच आहे. तत्कालीन जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी थेट शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने त्यांचे पद काढून रत्नाकर शिंदे यांच्याकडे देण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, त्यांच्यावरही कलाकेंद्रातील मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात गुन्हा नोंद झाल्याने रत्नाकर शिंदे शिंदे यांना पदावरुन हटविले होते. अलिकडे केवळ अनिल जगताप हेच जिल्हाप्रमुख होते.

आता अनिल जगताप यांच्याकडे बीड व माजलगाव विधानसभेचे सहसंपर्कप्रमुखपद देण्यात आले आहे, तर रत्नाकर शिंदे यांच्या गळ्यात पुन्हा जिल्हा प्रमुखपदाची माळ पडली असून, ते केज व परळी विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख असतील.गणेश वरेकर यांना बीड व माजलगाव विधानसभेच्या जिल्हा प्रमुखपदी नेमण्यात आले आहे, तर परमेश्वर सातपुते हे गेवराई व आष्टी विधानसभेचे जिल्हाप्रमुख असणार आहेत. (Shivsena UBT )

निजाम शेख यांना बीड नगर परिषद कार्यक्षेत्राचे शहर प्रमुख करण्यात आले आहे. माजी मंत्री बदामराव पंडित यांच्याकडे गेवराई व आष्टी विधानसभेचे सहसंपर्कप्रमुखपद तर बाळासाहेब अंबुरे यांना केज व परळी विधानसभा सहसंपर्कप्रमुखपद देण्यात आले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT