Diliprao Deshmukh, Amit Deshmukh, Ritesh Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh : काकांचा सल्ला, बंधू रितेश यांचे आवाहन अमित देशमुखांना पेलवणार का?

Jagdish Pansare

Latur News : दिवगंत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या लातूर तालुक्यातील निवळीच्या विलास सहकारी साखर कारखान्यातील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमात देशमुख कुटुंबातील सदस्यांनी केलेली भावनिक भाषणं आणि त्याची चर्चा अजूनही राज्यभरात होत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसचे राज्यातील बहुतांश बडे नेते लातूरात जमले होते.

रितेश देशमुख यांनी केलेले भावनिक भाषण बंधू आमदार अमित देशमुख यांना पाऊल उचलण्याचे केलेले आवाहन, माजी मंत्री आणि विलासरावांचे बंधू दिलीपराव यांनी आपल्या पुतण्यांना दिलेला सल्ला, याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या जोरात सुरू आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्षातून जाण्यामुळे होणारे राजकीय नुकसान भरून काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील या सगळ्यांनीच आमदार अमित देशमुख यांनी आता राज्यात फिरावे आणि काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

अभिनेता रितेश देशमुख यांच्या भाषणातूनही त्यांनी भैय्या आता पाऊल उचलण्याची योग्य वेळ असल्याचे सांगत आपलाही पाठिंबा दर्शवला. या सगळ्यात महत्वाचा आणि अर्थपुर्ण सल्ला दिला तो काका दिलीपराव देशमुख यांनी. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अमित, धीरज या आमदार बंधुंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

अशावेळी आहे तिथेच खंबीरपणे उभे राहा, खुर्चीसाठी कुठे जाल तर नुकसान होईल, असा वडीलकीचा सल्ला दिलीपराव यांनी दिला. अमित देशमुख हे मुंबईत रमणारे नेते म्हणून ओळखले जातात. विलासराव देशमुख यांच्यासारख लोकांमध्ये मिसळणं त्यांच्या स्वभावात बसत नाही. हीच मोठी अडचण त्यांना मोठी जबाबदारी घेण्यापासून मागे खेचते असेही बोलले जाते.

महाविकास आघाडी सरकारमध्ये लातूरचे पालकमंत्री असतांना त्यांच्यावर सातत्याने ते मुंबईतून लातूरचा कारभार हाकतात अशी, टीका भाजपकडून सातत्याने केली जायची. राज्यातील सत्तातरानंतर अमित देशमुख सर्वाधिक काळ मुंबईत आणि कधीतरी लातूरात यायचे, असाही आरोप त्यांच्यावर होतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस व महाविकास आघाडीच्या लोकसभा मिशनला धक्का पोचला आहे. यातून सावरायचे असेल तर किमान मराठवाड्यात कुणी तरी ही जबादारी खांद्यावर घ्यायला हवी. त्यासाठी लातूरच्या गढीकडे पुन्हा राज्यातील नेते आशेने पाहत आहेत. विलासराव देशमुख यांच्यानंतर कुटुंबाची आणि पुतण्यांची जबाबदारी स्वीकारलेल्या काका दिलीपराव देशमुख यांनीही या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.

रितेश देशमुख यांनी आपल्या भावाने आता लातूरपुरते मर्यादित न राहता राज्य पातळीवर काम करावे, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली. आता काकांचा सल्ला, भावाने केलेले आव्हान आणि नेत्यांनी देऊ केलेली संधी आणि अपेक्षांचे ओझे अमित देशमुख यांना पेलवणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT