Eknath Shinde, Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : ना धनुष्यबाण, ना भगवा झेंडा; अब्दुल सत्तार प्रासंगिक करार मोडण्याच्या दिशेने!

Will former minister Abdul Sattar break the casual agreement with Shiv Sena? : आगामी महापालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलाच आवाज जिल्ह्यामध्ये असला पाहिजे असा प्रयत्न सत्तार यांनी या शक्तीप्रदर्शनातून केला.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे माजी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काल आपल्या 61 व्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर मध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मित्रमंडळाच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा घ्यायला लावून सत्तार यांनी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप व इतर छोट्या-मोठ्या पक्षातील आपल्या समर्थकांना कामाला लावले. संपुर्ण जिल्हाभरातील सर्वपक्षीय स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांचा गोतावळा जमा करून सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यायचा तो संदेश दिला.

आगामी महापालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलाच आवाज जिल्ह्यामध्ये असला पाहिजे असा प्रयत्न सत्तार यांनी या शक्तीप्रदर्शनातून केला. विशेष म्हणजे शहरभर लावलेल्या पोस्टर, बॅनरबाजीवर ना भगवा झेंडा होता, ना बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे की एकनाथ शिंदे. (Eknath Shinde) ही पोस्टर पाहून 'कुठे आहे एकनाथ' हा धर्मवीर चित्रपटातील डायलाॅग आठवल्याशिवाय राहिला नाही.

शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेल्या सत्तार यांच्या एकस्ष्टीच्या सोहळ्यात त्यांच्या पक्षाचा एकही नेता, आमदार, खासदार उपस्थितीत राहू नये, यावरून सत्तार यांचे पक्षाशी आणि नेत्यांशी किती बिनसले आहे हे वेगळे सांगायला नको. सत्तार यांनी आपल्या कालच्या भाषणात पुन्हा एकदा जोपर्यंत एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला विश्वास आहे, तोपर्यंत आपण कुठेही जाणार नाही, हा जुनाच राग आळवला. एकीकडे मी तुमचाच असे दाखवायचे आणि दुसरीकडे मात्र पक्ष बाजूला ठेवून शक्तीप्रदर्शन करायचे यातून सत्तार येत्या काळात वेगळा निर्णय घेऊ शकतात? हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

शिवसेनेशी आपला प्रासंगिक करार झाला आहे, असे सांगणाऱ्या सत्तार यांचे कालचे शक्तीप्रदर्शन म्हणजे हा करार मोडण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे बोलले जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व इतर छोट्या-मोठ्या पक्षातील आपल्या समर्थकांना एकत्र आणत अब्दुल सत्तार यांनी शिवसेना आणि नेते एकनाथ शिंदे यांना एक सूचक इशारा दिला आहे. नव्यानेच मंत्री झालेल्या संजय शिरसाट यांच्याशी सत्तार यांचा येणाऱ्या काळात संघर्ष अटळ आहे.

सिल्लोडमधून गुंडगिरी संपवण्याची भाषा करणाऱ्या संजय शिरसाट यांचा सत्तार यांनी आपल्या भाषणातून घेतलेला समाचार हेच दर्शवतो. सिल्लोडमध्ये येणे एवढे सोपे आहे का? उलट मीच जिल्ह्यात येऊन तुमची गुंडगिरी संपवतो असा, थेट इशाराच सत्तार यांनी दिला आहे. स्वपक्षातील एकाही नेत्याला निमंत्रण न देता त्यांना दूर ठेवत अब्दुल सत्तार यांनी भविष्यात आपली वाटचाल वेगळी असेल याचे संकेत देऊ केले आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्ह्याचे नेतृत्व आपल्या हाती दिले नाही, तर तुमचा खेळ बिघडवणार हे दाखवणारा कालचा अभिष्टचिंतन सोहळा आणि शक्तीप्रदर्शन होते. मंत्रीमंडळातून डावलल्यानंतर आपली अडीच वर्ष थांबण्याची तयारी नाही, अडीच वर्षात राजकारणात काहीही होऊ शकते हे सत्तार यांनी सांगणे म्हणजे येणाऱ्या काळात जिल्ह्यात ते वेगळा पॅटर्न राबवू शकतात हे स्पष्ट होते. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची त्यांच्या त्यांच्या भागात किती ताकद आहे, हे आपल्या माहित आहे असे सांगत सत्तार यांनी त्यांनाही प्रोत्साहित केले आहे.

वैजापूरचे दिनेश परदेशी, अविनाश गलांडे, कन्नडचे केतन काजे, फुलंब्रीचे किशोर बलांडे, गंगापूरचे कृष्णा पाटील डोणगावकर, खोसरे, सिल्लोडचे राजू राठोड, पैठणचे तांबे अशा अनेकांची नावे घेत या मित्रांच्या जोरावर आपण राजकारण करत असल्याचे सत्तार यांनी ठणकावून सांगितले. जालन्याचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांची या सोहळ्यातील उपस्थिती सत्तार यांच्यासोबत असलेली त्यांची मैत्री दर्शवते. एकूणच अब्दुल सत्तार यांचे सध्या 'वेट अॅन्ड वाॅच'चे धोरण दिसत असले तरी त्यांचा 'बी प्लान' तयार असल्याचे त्यांनी काल दाखवून दिले आहे. आता एकनाथ शिंदे शिवसेनेतील हा अंतर्गत संघर्ष जिल्ह्यात कसा टाळतात? यावर सत्तार यांची पुढची भूमिका ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT