हफीज घडीवाला
कंधार : लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा-कंधार मतदार संघातून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारला. अजित पवारांनी चिखलीकरांना पक्षप्रवेश देत त्यांची उमेदवारी जाहीर केली. ते निवडूनही आले, आता राज्यातील नव्या महायुती सरकारमध्ये चिखलीकरांना मंत्री पदाची संधी मिळते का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
उद्योगांची वणवा, दळणवळणाचा खोळंबा, शैक्षणिक सुविधांचा अभाव, महामार्गाची उणीव, बेरोजगारी यामुळे जिल्ह्यातील एक दुर्लक्षित मतदारसंघ म्हणून लोहा-कंधार मतदारसंघ ओळखला जातो. (Pratap Patil Chikhlikar) आतापर्यंत या मतदारसंघाने बारा आमदार निवडून दिले, पण यापैकी एकालाही मंत्री पदाची संधी मिळाली नाही. राज्यातील बदल्यात समीकरणामध्ये लोहा-कंधारचा मंत्रीपदाचा दुष्काळ यावेळी तरी संपणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कंधारच्या विकासासाठी या मतदारसंघाला आता मंत्री पद मिळालेच पाहिजे, अशी अपेक्षा मतदार बाळगून आहेत. राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने स्थापन होत असताना नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकरांकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (NCP) कंधार हा जिल्ह्यातील ऐतिहासिक तालुका आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी या भागाचे सहा वेळा प्रतिनिधित्व केले आहे.
शासन दरबारी भाईंचा एक दरारा होता. 'मन्याड खोऱ्यातील वाघ' अशी त्यांची ओळख होती. भाईंनी मुंबई ते मछलीपटनम व्हाया कंधार या लोहमार्गाच्या मागणी बरोबरच कंधार येथे सैनिकी छावणी स्थापन करून विमान धावपट्टी तयार करावी आणि कंधार शहर महामार्गाशी जोडावे यासह विकासाच्या इतर मागण्या लावून धरल्या होत्या. त्याकाळी लोहमार्गाचा सर्व्हेही झाला होता. शहराबरोबरच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाई विधिमंडळात जाब विचारून सरकारला पळता भुई थोडी करायचे.
पण ते शेकापचे आमदार असल्याने सरकार त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे. भाईंची पूर्ण हयात शेकापमध्ये गेल्याने त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाला लाल दिव्याचा प्रश्नच आला नाही. भाईं नंतरच्या आमदारांचा सरकार दरबारी त्यांच्याएवढा दरारा नव्हता. यामुळे मतदारसंघ लाल दिव्यापासून आजवर वंचित राहिला. स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही कंधार विकास आणि लाल दिव्याबाबत अडगळीत आहे. चिखलीकर हे पहिल्यांदा 2004 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये पुन्हा त्यांनी मतदारसंघ काबीज केला.
2024 ची विधानसभा निवडणूक जिंकून त्यांनी टप्याटप्याने का होईना हॅटट्रिक साधली. चिखलीकर हे एक मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. फिल्डिंग लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. लाल दिव्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याचीही चर्चा आहे. पूर्वी चिखलीकर राष्ट्रवादीत होते. यामुळे त्यांचे अजितदादांशी चांगले संबंध आहेत. यामुळे चिखलीकरांच्या माध्यमातून मतदारसंघात पहिले मंत्रीपद येणार, अशी आशा त्यांचे समर्थक आणि तालुक्यातील जनता बाळगून आहे.
1952 ते 2024 या कालावधीत सुरुवातीला कंधार आणि आता लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात 16 आमदार निवडून आले. यात दिवंगत डॉ. भाई केशवराव धोंडगे सहा वेळा, प्रताप चिखलीकर तीन वेळा, रोहिदास चव्हाण दोनदा तर गोविंदराव मोरे, गुरुनाथ कुरूडे, ईश्वरराव भोसीकर, शंकरण्णा धोंडगे, श्यामसुंदर शिंदे यांनी प्रत्येकी एकदा मतदारसंघाचे नेतृत्व केले. मतदारसंघाचा कायापालट करण्याचे आश्वासन सर्वांनी दिले पण यश कोणालाच आले नाही. मतदारसंघाच्या कायापालट करायचा असेल तर मंत्रीपदच हवे, असे आता बोलले जाऊ लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.