Dhas-Bawankule-Munde News Sarkarnama
महाराष्ट्र

Suresh Dhas News : सुरेश धसांनी विश्वास गमावला, लपून-छपून घेतलेल्या मुंडेंच्या भेटीने पितळ उघडे!

MLA Suresh Dhas faces difficulties caused by party president Chandrashekhar Bawankule in recent political developments. : धस यांच्याकडून दररोज नवनवे आरोप, मागण्या आणि त्यावर सरकारकडून सारवासारर हा प्रकार महाराष्ट्रात दोन महिन्यांपासून सुरू आहे.

Jagdish Pansare

BJP Politics : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणानंतर या संपूर्ण प्रकरणात भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आरोपींच्या अटकेपासून त्यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या संबंधापर्यंत सगळ्या गोष्टी उजेडात आणल्या. विधानसभा निवडणुकीत आपल्या पराभवासाठी प्रयत्न केलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्याची संधी धस यांना सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परळीतील खंडणी प्रकरणाने मिळाली.

धनंजय मुंडे, वाल्मिक कराड व त्यांच्या समर्थकांशी एकाचवेळी पंगा घेण्याचा सुरेश धस (Suresh Dhas) यांचा निर्णय धाडसाचा होता. पण या धाडसासाठी त्यांना पक्षातील कोणत्या वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ होते हे वेगळे सांगयला नको. सुरेश धस यांनी गेली दोन महिने संतोष देशमुख खून प्रकरण, परळीतील खंडणी प्रकरणाच्या निमित्ताने धनंजय मुंडे आणि त्यांच्या जवळच्या लोकांचा सगळा कच्चाचिठ्ठा टप्याटप्याने बाहेर काढला. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी काढण्यात आलेल्या न्याय मोर्चाच्या व्यासपीठाचा मोठ्या खूबीने वापर झाला.

सुरेश धस यांचे राज्यभरातील दौरे आणि रोज नवनवी कागदपत्रे, पुरावे, व्हडिओ, सीडी, पेन डाईव्ह याचाच परिणाम वाल्मिक कराड व संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात झाला. (BJP) सरकारवर दबाव वाढला की तो वाढल्याचे दाखवले गेले? याबद्दलही शंका उपस्थित केल्या जात आहेत. कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजूनही फरार आहे.

दोन महिन्यात सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात असे काही रान पेटवले की त्यातून त्यांच्या राजीनाम्यानंतरच देशमुख कुटुंबाला न्याय मिळू शकतो, असा निष्कर्ष काढला गेला. राज्यात महायुतीचे सरकार आणि या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे मंत्री. शिवाय अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मुंडेंवर हात घालणे एवढे सोपे नाही. अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही, यावर एकमताने ठाम आहेत, यातच सगळं काही आलं?

संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली, त्यातील आरोपींना अटक व मकोका अंतर्गत कारवाई करत सरकराने आपण या प्रकरणात किती गंभीर आहोत हे दाखवले. कोणी कितीही मोठा असला, कोणत्याही पक्षाचा, नेत्याचा जवळचा असला तरी दोषी असेल तर सोडणार नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे व राष्ट्रवादीलाही कायम गॅसवर ठेवण्याची हुशारी दाखवली.

धस यांच्याकडून दररोज नवनवे आरोप, मागण्या आणि त्यावर सरकारकडून सारवासारर हा प्रकार महाराष्ट्रात दोन महिन्यांपासून सुरू आहे. धस यांना सपोर्टीव्ह अशी भूमिका अंजली दमानिया, करुणा शर्मा मुंडे यांनीही घेतली. पीकविमा घोटाळा, कृषी औषधी, फवारणी यंत्र व इतर सामुग्रीमध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढत तर कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात धनंजय मुंडेंना दोषी ठरवण्याचा आलेला न्यायालयाचा निकाल हा योगच म्हणावा लागेल.

या प्रकरणांनी उचल खालल्याने धनंजय मुंडे यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम केले. या संपूर्ण प्रकरणात सरकारची भूमिका 'साप भी मरे, पर लाठी ना तुटे' अशीच राहीली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्या सुरेश धस यांना आता लगाम घालण्याची वेळ आली आहे, हे ओळखूनच त्यांची धनंजय मुंडे यांच्याशी भेट घडवून आणण्यात आली, असे देखील बोलले जाते. गुपचूप झालेली ही भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच उजेडात आणल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

धनंजय मुंडे यांचे डोळ्याचे आॅपरेशन झाल्याने सुरेश धस यांना तातडीने जाऊन त्यांची भेट घ्यावी, वाटली हे ही न पटण्यासारखेच. पण जर स्क्रीप्ट ठरली असले तर त्यांनी ही भूमिका वठवावीच लागली असणार. साडेचार तास आम्ही सोबत होतो, अस सांगत बावनकुळे यांनी धस आणि मुंडे या दोघांचीही गोची केली. त्यामुळे रोज माध्यमांच्या समोर येऊन नवनवे आरोप करणाऱ्या धस यांच्या तोंडाला मुंडेंच्या घेतलेल्या भेटीवर स्पष्टीकरण देताना मात्र फेस आला.

दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देण्याची घोषणा केली. यासाठी आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि देशमुख कुटुंबासोबत न्याय मोर्चासाठी राज्यभरात फिरले. धस यांच्या धाडसाचे जाहीर कौतुक करत त्यांना पाठबळही दिले. पण मुंडे-धस यांच्या भेटीच्या बातमीने जरांगे यांनी त्यांना आधुनिक फितूर ही पदवी दिली.

आता सुरेश धस हे मराठा समाजाच्या डोळ्यावर तर आलेच, पण संतोष देशमुख खून प्रकरणाचा आपल्या राजकारणासाठी त्यांनी कसा वापर केला? असा आरोप देखील आता त्यांच्यावर होऊ लागला आहे. विरोधकांकडून करेक्ट कार्यक्रम केला जातो, हे आतापर्यंत ऐकिवात होते. इथे मात्र पक्षाच्या अध्यक्षानेच सुरेश धस यांना करेक्ट कार्यक्रम केला, असे दिसते. यापुढे लढा सुरूच ठेवणार असं सांगून धस आता सारवासारव करत आहेत, मात्र त्यांच्यावर आता विश्वास ठेवणार कोण? कारण त्यांनी तो आता गमावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT