Sharad Pawar, Rahul Gandhi Sarkarnama
महाराष्ट्र

MVA Rajya Sabha seat : बैठक संपली, पण सस्पेन्स कायम! राज्यसभेच्या जागेवरून मविआत धुसफूस; काँग्रेस-राष्ट्रवादी दाव्यावर ठाम, नेमके काय घडलं?

Congress vs NCP claim News : महाविकास आघाडीत पेच निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही पक्ष आपापल्या जागांसाठी अडून बसले आहेत, यावर अद्याप कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा आली आहे. त्या एका जागेवरून सध्या मविआमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. राज्यसभेच्या या एका जागेबाबत मविआमधील तीनही घटक पक्षाची गुरुवारी सकाळी बैठक पार पडली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी राज्यसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही पक्ष आपापल्या जागांसाठी अडून बसले आहेत, यावर अद्याप कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही.

गुरुवारी सकाळी विधिमंडळाच्या आवारातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. या प्रमुख नेत्यांसह झालेल्या या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी राजकीय समीकरणांवर भर दिला.

राज्यसभेत काँग्रेसचे (Congress) संख्याबळ वाढवणे ही काळाची गरज असून, राष्ट्रीय स्तरावर पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी ही जागा काँग्रेसलाच मिळावी, असा पवित्रा पक्षाने घेतला. ही जागा काँग्रेससाठी प्रतिष्ठेची असल्याचेही नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही पक्षाने त्यांची बाजू मांडली आहे. दोन्ही पक्ष आता त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आता याबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा मुद्दा उपस्थित केला. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून, राष्ट्रीय पातळीवर पक्षाची ताकद आणि प्रभाव कायम ठेवण्यासाठी त्यांनाच उमेदवारी मिळणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडले. शरद पवार यांची या संदर्भातील वैयक्तिक इच्छा काय आहे, हे जाणून घेतल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस आपली अंतिम भूमिका जाहीर करणार आहे.

या बैठकीवेळी दोन्ही पक्ष राज्यसभेच्या या एकमेव जागांसाठी अडून बसले असले तरी, यावर अद्याप कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही. काँग्रेसने या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादीला कळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील गुरुवारी दुपारी शरद पवार यांची भेट घेऊन बैठकीचा तपशील देणार आहेत. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असून त्यासाठी त्यांनी वेळ मागितली असल्याचे समजते. त्यामुळे या दोन्ही पक्षाचे मत ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT