Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगलीतच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. सांगली शहर राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असून जवळपास 14 माजी नगरसेवक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांचे कट्टर मानले जाणारे नगरसेवकही पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. जयंत पाटील यांच्यासाठी हा धक्का मानला जात असून लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतची माहिती सांगली शहराध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली. (14 former corporators At Sangli city will join Ajit Pawar's NCP)
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातच राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागले आहे. कवठे महांकाळ येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक फुटल्यानंतर आता सांगली शहरातील 14 माजी नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर नाराजी दर्शवत 14 माजी नगरसेवकांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्थानिक नेतृत्वावर नाराजी दाखवत जयंत पाटील यांचे कट्टर समजले जाणारे मैनुद्दीन बागवान, विष्णू माने, सुरेश आवटी, आनंदा देव माने आणि राष्ट्रवादी शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे या शिष्टमंडळाने मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली. या चर्चेदरम्यान 14 माजी नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जगदाळे यांनी दिली. जयंत पाटील यांचे कट्टर समजले जाणारे शेटजी मोहिते हे देखील अजितदादांच्या गळाला लागले आहेत.
भाजपचे माजी नगरसेवक आनंद देव माने यांनीही भाजपचे नऊ माजी नगरसेवक अजितदादांच्या गटात सामील होतील, त्याचबरोबर मिरज कुपवाड महापालिकेतील काही माजी नगरसेवक आपल्यासोबत येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच अशा पद्धतीने राष्ट्रवादी फुटत असल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.