Akluj Nagar Parishad  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : कोणाचं घेणार नाव?...पाडापाडीचा शिजलाय डाव; सोलापुरातील 11 नगरपरिषदांच्या मतदार यादीवर 34 हजार हरकती

Nagar Palika Election 2025 : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल 34 हजार 76 हरकती दाखल झाल्या असून चुकीच्या प्रभागात नावे नोंदवल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.

प्रमोद बोडके
  1. सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल ३४,०७६ हरकती दाखल झाल्या असून, बहुतांश तक्रारी “मी या प्रभागात राहतो पण नाव दुसऱ्याच प्रभागात” अशा स्वरूपाच्या आहेत.

  2. या मोठ्या संख्येतील हरकतींमुळे प्रशासनावर अतिरिक्त भार पडला असून, आता स्पॉट व्हेरिफिकेशन मोहिम राबवली जाणार आहे.

  3. अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर रोजी आणि मतदान केंद्रांची यादी ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

Solapur, 25 October : सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल ३४ हजार ७६ हरकती दाखल झाल्या आहेत. मी या प्रभागात राहतो आणि माझं नाव दुसऱ्याच प्रभागात असल्याच्या बहुतांश तक्रारी आहेत. नगरपरिषदेच्या निवडणुकीत कोणाला पाडायचे अन्‌ कोणाला निवडून आणायचे? हाच डाव खेळल्याचे आता उघड होऊ लागले आहे. हा डाव खेळला कोणी? याचा ठोस पुरावा हातात नसल्याने पाडापाडीचा धोका असलेल्या भावी नगरसेवकांनी हरकतींचा मार्ग स्वीकारल्याचे दिसते. एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती आल्याने प्रशासनही आवाक्‌ झाले आहे.

अतिवृष्टी व महापुराच्या संकटातून बाहेर पडल्याने जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमोर हे नवीनच काम वाढून ठेवले आहे. येत्या काळात जवळपास सर्वच नगरपरिषदांमध्ये (Nagar Parishad) हरकतींवरील स्पॉट व्हेरिफिकेशनची मोहिम जोर धरणार आहे, त्यामुळे प्रशासनासमोर नवी डोकेदुखी उभी राहणार आहे.

सोलापूर (Solapur)जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी, कुर्डूवाडी, मोहोळ, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, करमाळा, सांगोला, अकलूज आणि अक्कलकोट या ११ नगरपरिषदा व अनगर (ता. मोहोळ) नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. प्रारूप मतदार यादीत अनगर वगळता सर्वच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हरकतींचा अक्षरश: पाऊस पडला आहे. नगरसेवकांच्या आरक्षणात कोणताही बदल न सूचविता या आरक्षणाला आज विभागीय आयुक्तांनी मंजूरी दिली आहे. या आरक्षणाचे राजपत्र आता मंगळवारी (ता. २८) प्रसिद्ध होणार आहे.

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी ४ लाख ४२ हजार ६११ एवढे मतदार आहेत. यापैकी ३४ हजार ७६ मतदारांच्या हरकती आहेत. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी असलेल्या एकूण मतदारांच्या ७.७ टक्के मतदारांच्या बाबतीत हरकती दाखल झाल्या आहेत. नगरपरिषदांच्या आगामी निवडणुकीतील चुरसच या हरकतींवरून स्पष्ट होऊ लागली आहे.

नगरपरिषदनिहाय आलेल्या हरकती

पंढरपूर : १२ हजार ५९९ - बार्शी : ८ हजार ७८७ - कुर्डूवाडी : ३ हजार ७७० - मोहोळ : ३ हजार ३०४ - मंगळवेढा : १ हजार ७२३ - मैंदर्गी : १ हजार ४९० - करमाळा : १ हजार ८ - दुधनी : ५१७ - सांगोला : ४०६ - अकलूज : २२६ - अक्कलकोट : २०६

अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोंबरला

प्रभागनिहाय मतदार याद्यांची प्रसिद्धी ८ ऑक्टोबरला झाल्यानंतर ८ ते १७ ऑक्टोंबरदरम्यान या यादीवर आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्या त्या नगरपरिषदांसाठी नियुक्त केलेले उपजिल्हाधिकारी/प्रांत अधिकारी हे आलेल्या हरकतींचे स्पॉट व्हेरिफिकेशन करणार आहेत. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी ३१ ऑक्टोंबरला होणार आहे. मतदान केंद्राची यादी ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

Q1. सोलापूर जिल्ह्यातील किती नगरपरिषदांच्या मतदार यादीवर हरकती दाखल झाल्या?
A1. ११ नगरपरिषदांच्या मतदार यादीवर ३४,०७६ हरकती दाखल झाल्या आहेत.

Q2. सर्वाधिक हरकती कोणत्या नगरपरिषदेवर दाखल झाल्या आहेत?
A2. पंढरपूर नगरपरिषदेवर सर्वाधिक १२,५९९ हरकती दाखल झाल्या आहेत.

Q3. अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार आहे?
A3. अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होईल.

Q4. हरकतींची तपासणी कोण करणार आहे?
A4. नियुक्त उपजिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी स्पॉट व्हेरिफिकेशनद्वारे तपासणी करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT