Solapur BJP : सोलापूर भाजपत मोठा उद्रेक; दिलीप मानेंच्या प्रवेशाला विरोध, कार्यकर्त्यांचा उद्या पक्ष कार्यालयावर मोर्चा!
Solapur, 20 October : सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसविण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली फोडाफोडीची मोठी खेळी खेळली आहे. मात्र, ती खेळी भारतीय जनता पक्षावर बूमरॅंग होते की काय, अशी परिस्थिती आहे. कारण दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध असल्याचे समोर आले असून त्याबाबत आवाज उठविण्यासाठी उद्या (ता. 21 ऑक्टोबर) शहरातील पक्ष कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी नुकतीच मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्या भेटीनंतर माजी आमदार राजन पाटील यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत, तर दिलीप माने (Dilip Mane) यांनी दिवाळीनंतर आपला भाजप प्रवेश होईल, हे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जाहीर केले आहे.
माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश निश्चित होताच, सोलापूर दक्षिण भाजपमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. जाहीरपणे त्याबाबत कोणी काही बोलले नसले तरी आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्याच विजयाच्या घोषणा द्यायच्या काय, या विवंचनेत सध्या दक्षिण सोलापूर भाजप कार्यकर्ते आहेत.
खुद्द सुभाष देशमुख यांनीही एका ज्येष्ठ नेत्यासोबत ‘तुमच्या पक्षात जी तुमची अवस्था आहे, तशीच अवस्था आमच्या पक्षात आमची आहे’ अशी खंतही बोलून दाखवली आहे. कडक शिस्तीच्या संघ परिवारातून आलेल्या सुभाषबापूंनी स्वभावाप्रमाणे त्यावर थेटपणे बोलणे टाळले आहे. मात्र, कार्यकर्त्यांच्या मनातील असंतोषाचा भडका उडाला आहे. कार्यकर्त्यांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यातूनच भाजपच्या सोलापूर शहर कार्यालयावर उद्या मोर्चा काढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. पक्ष कार्यालयासमोर धरणे धरले जाणार असून जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांना निवेदन दिले जाणार आहे.
या मोर्चात माजी नगरसेवक, सोलापूर दक्षिण मतदासंघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि निष्ठावंत सहभागी होणार आहेत, त्यामुळे या मोर्चानंतर सोलापूरच्या भाजपमध्ये उद्रेकाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपचे जुने नेते आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे सध्याच्या घडामोडीपासून दूरच आहेत, त्यामुळे जुन्या निष्ठावंतांची भूमिका स्पष्ट करणारा हा मोर्चा ठरण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री आणि दिलीप मानेंचे नाते
दिलीप माने आणि जयकुमार गोरे हे काँग्रेसच्या मुशीत घडलेले नेते आहेत. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत, त्यांच्या आग्रहानंतरच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मानेंशी युती करण्यात आली. त्यानंतर सभापतिपदीही मानेंना संधी देण्यात आली. पालकमंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच दौऱ्यात जयकुमार गोरे यांनी दिलीप मानेंच्या घरी भेट देऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला होता, त्यामुळे दोघांचे नाते किती घट्ट आहे, हे दिसून येते. त्यांच्याच पुढाकारातून मानेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.
कलंकित नेत्यांच्या प्रवेशाच्या निर्णयाचा निषेध करणार : भाजप तालुकाध्यक्ष
गेल्या दहा वर्षांत सोलापूर दक्षिण मतदारसंघात भारतीय जनता पक्ष मजबुतीने विस्तारला आहे. त्यानंतरही आजपर्यंत भाजप कार्यकर्त्यांना त्रास दिलेल्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश दिला जात आहे. कलंकित नेत्यांमुळे पक्ष बदनाम होण्याची होईल, त्यामुळे पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढून अशा कलंकित नेत्यांना प्रवेश देण्याच्या निर्णयाचा निषेध केला जाणार आहे, असे भाजपचे दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.