Devendra Fadnavis-Abhijeet Patil
Devendra Fadnavis-Abhijeet Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Abhijeet Patil : राष्ट्रवादीकडून घोषित झालेले अभिजित पाटील भाजपचे पंढरपूरचे उमेदवार ठरतील काय?

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 30 May : लोकसभा निवडणुकीच्या मध्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी कारखान्यावरील कारवाईनंतर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. विठ्ठल कारखान्यासाठी राजकीय त्याग करीत आहे, असे सांगणाऱ्या अभिजीत पाटील यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढू लागली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या संपर्कामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून घोषित झालेले अभिजित पाटील कदाचित भाजपचे उमेदवार ठरणार का? अशी चर्चा या निमित्ताने मतदारसंघात सुरू झाली आहे.

अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. त्याच कार्यक्रमात बोलताना पवार यांनी अभिजित पाटील यांच्या पंढरपूर-मंगळवेढा (Pandharpur-Mangalvedha) विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसंदर्भात संकेत दिले होते. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवारांनी तेच पंढरपूरचे पक्षाचे उमेदवार असतील, असे सांगितले होते. अभिजित पाटील यांनीही पायाला भिंगरी लावून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात कार्यकर्त्यांना जोडून घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोट बांधण्यास सुरुवात केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत सत्ताधारी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या समवेत सुरुवातीच्या टप्प्यात प्रचारही केला. पंढरपुरात शिवतीर्थावर पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नावर शरद पवार यांच्या उपस्थितीत अतिशय मुद्देसूद मांडणी केली. त्यानंतर दोन दिवसांत विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. दोन गोदामे सील करण्यात आली.

विठ्ठल कारखान्यावरील कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर त्यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विठ्ठल कारखान्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. त्याच सभेत फडणवीसांनी अभिजित पाटील यांना आवश्यक त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका जाहीर केली होती. तेव्हापासून ते फडणवीस यांच्या कायम संपर्कात आहेत.

भीमा नदीपात्रातून परवा सोलापूरसाठी पाणी सोडल्यानंतर खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पाटील यांनी फडणवीसांची भेट घेत निवेदन दिले. त्यानंतर 26 मे रोजी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने दोन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या नुकसानीची पाहणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी शेतीच्या बांधावर जाऊन केली. तशीच पाहणी आमदार समाधान आवताडे यांनी करत प्रशासनाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी मात्र थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणी केली, त्यामुळे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत. त्यांचा वाढता संपर्क विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मतदारसंघातील रखडलेल्या प्रश्नाला निधी मिळविण्यासाठी फायदेशीर ठरणार का, हेही पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT