Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : खुल्या मनाने पराभव स्वीकारला; तुमच्या पोटनिवडणुकीतील पराभवाची कारणे द्या...

Umesh Bambare-Patil

सातारा : ज्यामध्ये जय किंवा पराजय अपेक्षित असतो, त्यालाच निवडणुका म्हणतात. आमचा पराभव आम्ही खुल्या मनाने स्वीकारला आहे. तसेच ज्यावेळी जय झाला त्यावेळी हुरळुनही गेलो नाही. आमच्या लोकसभेतील पराभवाची कारणं तोंडवर करुन विचारताय, आधी तुमच्या विधानसभेतील पोटनिवडणुकीच्या पराभवाची कारणं द्या, असे प्रतिउत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले आहे.

लोकसभेतील पराभवाची कारणे शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना विचारली होती. त्यावर उदयनराजेंनी त्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर दिले आहे. खासदार उदयनराजे म्हणाले, मुळातत्यांनी मर्ज करण्यासाठीच बँक स्थापन केली होती. एक बँक तुमच्या अंदाधुंद कारभाराने बुडीत काढली. पण, त्याकरीता दुसऱ्या बँकेचाही गळा घोटला. सहकारी बझारचे रेस्टॉरेंट केले, पुढे रेस्टॉरंटही बंद पाडले, हे प्रकार सहकारातील तत्वज्ञानात येत नाही परंतु हाच तुमचा खरा वारसा आहे.

सहकारी संस्था सभासदांच्या मालकीच्या आणि उध्दारासाठी आहेत, ही आमची धारणा तर सहकार म्हणजे स्वतःची खाजगी मालमत्ता ही तुमची धारणा आहे. त्यामुळे दोघांमधील विचारांची उंची व खोली सुध्दा वेगळी आहे. दुस-याच्या पराभवाची कारणे विचारणारे तुम्ही स्वतःला अहंकारी समजता आहात. अहंकाराने सर्वनाश होता हे तुम्ही जाणीवपूर्वक विसरत आहात.

अजिंक्यतारा कारखाना निवडणुक लागल्यावर एकदा भ्रष्ट कारभाराबाबतची अपराधी भावना घेवून तुम्ही आमच्याकडे आला होता. निवडणुकीत लक्ष घालू नका. मी सर्व चुकांची दुरुस्ती करतो असे देखील म्हणाला होता. हे इतक्या लवकर कसे विसरलात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर आम्ही छाती काढून सभासदांपुढे गेलो. तर तुमची छाती जावून, नुसत्या बरकडया राहतील. याची पहिल्यांदा नोंद घ्या आणि मग आमच्या छातीकडे या. तुमचे ते काम आणि आमचा तो स्टंट असा शोध तुम्ही लावलेला आहे.

आम्ही ज्यावेळी एकादा प्रकल्प अंतिम टप्यात येतो त्यावेळी त्याची निधीच्या आकडेवारीसह आणि तांत्रिक बाबींसह आम्ही माहीती देत असतो. तुमच्यासारखे आता प्रस्ताव मुख्याधिकारी यांना दिला. लगेच त्याचा फोटो आणि बातमी, आता तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे आला. त्याचा फोटा आणि बातमी. आता तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे गेला, त्याचा फोटो आणि बातमी. आता तो प्रस्ताव सचिवांकडे गेला त्याची बातमी आणि त्याचा तुमचा फोटो.

आता तो प्रस्ताव जर दादांकडे असेल तर त्याची बातमी आणि यांचा फोटो. परंतू अन्य महोदयांकडे असेल तर मात्र, यांना तेथे कोणी विचारतच नाही. त्यामुळे त्याची बातमी नाही आणि फोटोसुध्दा नाही. तुम्ही परफेक्शनिस्ट नव्हे तर फंक्शनिष्ट आहात. असला प्रकार तुमचा तुम्हालाच शोभून दिसतो. हा फरक सुध्दा एक आपल्या मार्गातील वेगळेपण दाखवणारा आहे.सातारा-कराड हे जंक्शन नाही. त्यामुळे येथुन गाडी सुरु करता येत नाही. याचे देखील यांना भान नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला... असा यांचा एकंदरीत नखरा आहे.

प्लॅटफॉर्म लांबी, प्लॅटफॉर्म शेड, लोहमार्गाचे दुहरीकरण, विद्युतीकरण प्रवाश्यांच्या सुविधांमधील सुधारणा अशी किती तरी कामे केली आहेत. १०-१२ वर्षापूर्वी फक्त नऊ गाड्यांची ये-जा सुरु होती. आज रोजी १९ गाडयांची ये-जा सुरु आहे. म्हणजे पूर्वीच्या अप अॅण्ड डाऊन १८ गाडयांच्या तुलनेत ३८ रेल्वेगाडया आज सातारा कराड मधुन धावतायत, एकदा डोळ्यात अंजन घालुन बघा म्हणजे दिसेल आणि समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT