Suresh Bhosale-Atul Bhosale-Udaysinh Patil Undalkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Politic's : कराडमध्ये नव्या मैत्रीपर्वाचा ‘उदय’ : अजितदादांचा नेता भाजप आमदार अतुल भोसलेंना देणार टाळी!

Krishna sugar Factory elections 2026 : कृष्णा साखर कारखाना निवडणुकीत भोसले आणि उंडाळकर गटातील वाढती जवळीक चर्चेत असून नव्या राजकीय समीकरणांकडे सातारा-सांगलीचे लक्ष लागले आहे.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 24 May : यशवंतराव मोहिते सहकारी साखर कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीची राजकीय रणधुमाळी निर्णायक टप्प्याकडे सरकत आहे. कारखान्यासाठी नव्या राजकीय समीकरणांचा ‘उदय’ तालुक्यात होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भोसले गट आणि उंडाळकर गट यांच्यातील संभाव्य राजकीय जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे.

बाजार समितीतील चहापानाच्या निमित्ताने झालेल्या ‘अतुल’नीय भेटीनंतर या चर्चांना पुष्टी मिळाली आहे. ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Adv Udaysinh Patil Undalkar) यांच्या रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा पुढील दोन-तीन दिवसांत होणार आहे, त्यातून मैत्रीची रणनिती आखली जाणार असल्याने त्याकडे सातारा, सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सातारा (Satara) आणि सांगली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याचे राजकारण प्रत्येक निवडणुकीवेळी बदलते. त्या कारखान्याच्या राजकारणावरुन कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणेही अनेकदा बदलली आहेत.

कृष्णा कारखान्याची निवडणूक सध्या ऐन बहरात आहे. या निवडणुकीत सध्या विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचे आणि माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या पॅनेलमध्ये थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. कारखाना निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. यावेळी कट्टर विरोधक असलेले भोसले आणि उंडाळकर गट पुन्हा एकत्र येताना दिसत आहे. त्याचा पहिला अध्याय बाजार समितीतील चहापानाने पार पडला.

आता उंडाळकर गटाने त्यांच्या रयत संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यातील निर्णय हा निवडणुकीच्या राजकीय पटावर परिणाम करणारा ठरू शकतो. मेळाव्यात भूमिका जाहीर करून थेट पाठिंब्याचा निर्णय घेतला जाणार की अजून काही राजकीय अवकाश ठेवला जाणार, यावर विविध स्तरावर अंदाज बांधले जात आहेत. मात्र, या मेळाव्यात मैत्रीचा नवा अध्याय पाहायला मिळेल, असेही राजकीय जाणकरांकडून सांगितले जात आहे, त्यामुळे या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मेळाव्याला भोसलेंचीही उपस्थिती?

रयत संघटनेचा मेळावा ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यात कृष्णा कारखान्यासाठीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी पाठिंबा कोणाला असेल, याचा पहिला अंक बाजार समितीमधील चहापानावरुन सर्वांनाच पाहायला मिळाला आहे. त्यामुळे रयत संघटनेच्या मेळाव्याला कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले हे उपस्थित राहिले, तर त्यात नवल वाटायला नको. त्यामुळे त्यांनाही या मेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT