Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ZP Election : कार्यकर्ता जपवा अजितदादांनीच...निष्ठावंतासाठी खास गाडी पाठवून दिला एबी फॉर्म...

Ajit Pawar Sent AB Form In Pandharpur : राष्ट्रवादीच्या एकत्र लढण्याच्या निर्णयामुळे सोलापुरात उमेदवारांची कोंडी झाली असून, निष्ठावंतासाठी अजित पवारांनी थेट हस्तक्षेप करत पंढरपुरात एबी फॉर्म पाठवून राजकीय संदेश दिला.

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur, 22 January : दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र लढण्याच्या निर्णयानंतर सोलापूर जिल्ह्यातील अनेक इच्छुकांची कोंडी झाली आहे. अनेक निष्ठावंतांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पंढरपूर तालुक्यातील निष्ठावंत हणमंत पवार यांच्या पत्नीने गोपाळपूर गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला नव्हता, पंढरपुरात ज्यांच्याकडे अधिकार होते, त्यांनीही हात वर केले, त्यामुळे पवार यांनी थेट अजितदादांना फोन केला आणि दादांनीही निष्ठावंतासाठी खासगी गाडी करून पंढरपुरात एबी फार्म पाठवला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पक्षाला किती फायदा होतो, हे निकालानंतर दिसून येईल. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही पवारांशी निष्ठेने राहणाऱ्या अनेकांचा मोठी अडचण झाली आहे. त्यातून अनेकांवर अन्याय होत असल्याचे झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान दिसून येत आहे.

आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्याकडे पंढरपूर आणि माढ्यातील उमेदवार ठरविण्याचे अधिकार आले, त्यांनी कल्याणराव काळे समर्थकांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यास नकार दिला. त्यामुळे कल्याणराव काळे, त्यांचे बंधू समाधान काळे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी भाजपत जाऊन समर्थकांसाठी उमेदवारी मिळविली.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पंढरपूर तालुक्यातील निष्ठावंत म्हणून हणमंत पवार यांची ओळख आहे. त्यांची पत्नी सुनीता पवार यांनी गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी सुनीता पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत एबी फॉर्म मिळाला नव्हता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्यांच्याकडे एबी फॉर्म दिले होते. त्यांच्याकडेही हणमंत पवार यांनी मागणी केली. मात्र, त्यांनीही ऐनवेळी हात वर केले. शेवटी हणमंत पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. अजितदादांनीही सच्चा कार्यकर्त्यासाठी खास गाडी पाठवून एबी फार्म पाठवून दिला. पवार यांना गुरुवारी दुपारच्या निर्धारित वेळेआधी राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला. त्यानंतर त्यांनी तो एबी फॉर्म उमेदवारी अर्जासोबत जोडला. अजितदादांनी आपल्या खासगी माणसासाठी पाठविलेल्या एबी फॉर्मची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

दरम्यान, भाजपने गोपाळपूर गटातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोपाळ अंकुशराव यांच्या पत्नी दुर्गा गोपाळ अंकुशराव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने हणमंत पवार यांच्या पत्नी सुनीता पवार यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व्यंकट भालके यांनी स्वतः कासेगावमधून, तर त्यांच्या पत्नी भालके यांनी गोपाळपूरमधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

करकंब जिल्हा परिषद गटात माजी आमदार प्रशांत परिचारक यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब देशमुख यांना उमेदवारी नाकारून भाजपने आदिनाथ देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या देशमुख यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे व्यापार उद्योग विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांनी टाकळी पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने संदीप मांडवे यांना उमेदवारी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT