

Solapur, 18 January : नारायण पाटील आणि अभिजीत पाटील हे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत, ते माझे जिवलग सहकारी आहेत. पण, पालकमंत्री जयकुमार गोरे हे त्यांच्यावर वारंवार दबाव टाकून, वेगवेगळ्या प्रकारच्या अडवणुका करून त्यांना आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे मतं आमची घेऊन सत्ता भाजपची आणायच्या विचारात असतील, तर तो डाव हा उत्तम जानकर या सोलापूर जिल्ह्यात यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा आमदार उत्तम जानकर यांनी पालकमंत्री गोरेंना दिला.
आमदार जानकर म्हणाले, पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सोलापूर जिल्ह्यात काही पक्षांतरे घडवून आणली आहेत. माजी आमदार राजन पाटील, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित शिंदे आणि इतरांचा त्यात समावेश आहे. आम्ही म्हणतो तेच झाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. माढा आणि करमाळ्याचे चित्र बघायचं झालं, तर माढ्यात रणजित शिंदे आणि संजयमामा शिंदे ही दोन्ही लोकं त्यांचीच आहेत. तरीसुद्धा आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्यात आमदार नारायण पाटील यांच्यावर तुम्ही आघाड्या केल्या पाहिजेत.
तुम्ही आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली पाहिजे. तुमच्या आघाड्यांना आम्ही रसद पुरवू. त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला झेडपीमध्ये ही संख्या दिली पाहिजे. म्हणजेच मतदान विरोधी आघाडीचं घ्यायचं आणि निवडून आलेली माणसं त्या ठिकाणी नेऊन द्यायची, अशा पद्धतीचा फॉर्म्युला पालकमंत्री जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यांत राबवत आहेत, असा दावाही उत्तम जानकर (Uttam Jankar )यांनी केला.
जानकर म्हणाले, जिल्ह्यातील अनेक लोकांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम पालकमंत्री गोरे करत आहेत, असं माझं मत आहे. सांगोला नरगपालिका निवडणुकीत शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना कमळाचा प्रचार करायला लावला. त्याचा परिणाम नगरपालिका जाण्यात झाला. पण, ती ज्या फरकाने गेली, तो फरक सोलापूर जिल्ह्याला अचंबित करणारा आणि डॉ. देशमुख यांचं राजकीय जीवन कायमचं उद्ध्वस्त करणारा होता.
सांगोल्याप्रमाणेच आज माढा आणि करमाळ्यात पालकमंत्री प्रयोग करत आहेत. तुम्ही पक्षात घेतलेले रणजित शिंदे यांच्यासाठी ताकद लावा ना. त्यांना निवडून आणा. पण एकाला पक्षात घ्यायचं आणि रसद दुसऱ्याला पुरवायची. त्यातून त्यांनाही उद्ध्वस्त करायचं काम पालकमंत्र्यांकडून सुरू आहे, असा आरोप जानकर यांनी केला.
उत्तम जानकर म्हणाले, तुम्ही निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढा. म्हणजे मतं शरद पवारांची आणि निवडून आल्यानंतर तुम्ही भाजपला मदत केली पाहिजे, असं चित्र सोलापूर जिल्ह्यात आहे. पंढरपूर नगरपालिकेत अभिजीत पाटील यांना स्वतंत्रपणे लढायला लावलं. पण त्या निवडणुकीत पाटलांची पुरती वाट लागली. (सर्व उमेदवार पराभूत झाले) त्यातून पाटील हे ॲडजेस्टमेंट करणारा माणूस आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला
नारायण पाटील आणि अभिजीत पाटील हे माझ्या पक्षाचे आमदार आहेत, ते माझे जिवलग सहकारी आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे त्यांच्यावर वारंवार दबाव टाकून, वेगवेगळ्या प्रकारच्या अडवणुका करून भाजपच निवडून यावा आणि त्यांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त व्हावं, अशा पद्धतीचे व्यूहरचना करत आहेत.
मी पालकमंत्र्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही पक्षासोबत घेतलेले मोहिते पाटील, माझी, बाबासाहेब देशमुख यांची अवस्था काय केली? भाजपमधील निष्ठावंत विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख यांचीही वाट लावण्याचे काम करण्यात आलेले आहे, असा गंभीर आरोप जानकर यांनी केला आहे.
पालकमंत्री गोरे यांना मला एक सबुरीचा सल्ला द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या पक्षासाठी काम करा. पण मतं आमची घेऊन सत्ता भाजपची आणायच्या विचारात असाल, तर तो डाव हा उत्तम जानकर या सोलापूर जिल्ह्यात होऊ देणार नाही, असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरेंना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.