Ajit Pawar-Kalyanrao Kale-Abhijeet Patil-Babanrao Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Politic's : बबनराव शिंदेंच्या भूमिकेमुळे अजितदादांची कोंडी; माढ्यात कल्याण काळे की अभिजीत पाटलांनी संधी?

Assembly Election 2024 : आमदार शिंदे यांनी साथ सोडल्याने अजितदादांपुढे सक्षम उमेदवाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजितदादा सहकार शिरोमणी साखर काखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळेंना उमेदवारी देणार की अभिजीत पाटील यांच्यावर ऐनवेळी डाव लावणार, हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 October : माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडत आपल्या मुलाला अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसपुढे उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये माढा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.

आमदार शिंदे यांनी साथ सोडल्याने अजितदादांपुढे सक्षम उमेदवाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजितदादा सहकार शिरोमणी साखर काखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळेंना उमेदवारी देणार की अभिजीत पाटील यांच्यावर ऐनवेळी डाव लावणार, हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होणार आहे. बबनराव शिंदेंच्या भूमिकेमुळे अजित पवारांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी घेतला होता. सत्तेत राहण्याचा फायदा आमदार शिंदे यांना मिळाला. मात्र, लोकसभा निवडणुकीतील वारे पाहून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांशी संधान बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे.

आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांनी आतापर्यंत शरद पवार यांची तीन वेळा भेट घेतली आहे. मुलगा रणजितसिंह शिंदे यांना महाविकास आघाडीकडून तुतारीची उमेदवार मिळावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजूनही त्यांना उमेदवारीचा शब्द दिलेला नाही.

वारंवार भेटूनही पवारांकडून उमेदवारीचा शब्द येत नसल्यामुळे बबनराव शिंदे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना महाविकास आघाडीकडून तुतारीची उमेदवारी मिळाली नाही, तर माझा मुलगा रणजित शिंदे हा विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवेल, अशी घोषणा केली आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर अजितदादांची महायुतीमध्ये कोंडी झाली आहे. माढ्यातून कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे, असा त्यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे.

माढा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील जोडलेली 42 गावे महत्त्वपूर्ण ठरत असून या गावातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे प्रमुख चेहरा अजितदादांपुढे पर्याय असणार आहे. यापूर्वीही त्यांनी माढ्यातून २०१४ मध्ये निवडणूक लढवली असून त्यांना तब्बल ६२ हजार मते मिळालेली आहेत, त्यामुळे रणजित शिंदे यांना ते चांगली टक्कर देऊ शकतात.

निवडून येण्याच्या निकषांवर अजित पवार यांच्यापुढे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचा पर्याय असू शकतो. अभिजीत पाटील यांनीही माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून ते गेली महिनाभर मतदारसंघात फिरत आहेत. मात्र, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची याची वाचता त्यांनी अजूनही केलेली नाही.

लोकसभा निवडणुकीपासून भाजपसोबत असणारे अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश अजित पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार का? हा खरा प्रश्न आहे.

माढा मतदारसंघातून मागील वेळी शिवसेनेने राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही माढा मतदारसंघावर दावा करू शकते, त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो आणि उमेदवारीचा प्रश्न महायुतीचे नेते कशा पद्धतीने मिटवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT