Ajit Pawar-Udaysinh Patil Undalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : अजितदादांच्या खेळीने ‘पृथ्वीराजबाबां’ची पुरती नाकाबंदी; साताऱ्यातील काँग्रेसचा अखेरचा गडही कोसळणार!

Udaysinh Patil Undalkar Will join NCP : विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कॉंंग्रेसची विचारधारा जाेपासली होती. शरद पवार यांनीही त्यांना राष्ट्रवादीत येण्याची विनंती केली होती. मात्र, पराभव पत्करावा लागला तरी, त्यांनी कॉंग्रेस पक्षाची विचारधारा शेवटपर्यंत सोडली नव्हती.

हेमंत पवार

Karad, 09 March : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या डावपेचामुळे सातारा जिल्ह्यात अखेरची घटका मोजत असलेली कऱ्हाड दक्षिणमधील उरली सुरली काँग्रेसही संपुष्टात येणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही यामुळे पुरती कोंडी होणार आहे. ज्या साताऱ्याने काँग्रेस पक्षाला दिग्गज नेते दिले, त्याच साताऱ्यात आज काँग्रेसला अखेरची घरघर लागली आहे आणि ती माजी मांत्री (स्व.) विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयामुळे कऱ्हाड दक्षिणमध्ये अधिक दुबळी होणार हे निश्चित आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मातब्बर पुढारी, केंद्र सरकारमध्ये महत्वाची पदे भूषवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपचे अतुल भोसले यांच्याकडून मानहानीकारक असा पराभव झाला. साताऱ्यातून (Satara) ते काँग्रेसचे एकमेव आमदार निवडून यायचे. मात्र, त्यांच्या पराभवामुळे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून येऊ शकलेला नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीतच काँग्रेसचे दारुण अवस्था प्रकर्षाने पुढे आली होती.

विधानसभा निवडणुकीत पराजयामुळे गलितगात्र झालेल्या काँग्रेसवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी अखेर घाव घातला आहे. पवारांसोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysinh Patil Undalkar ) यांनी कॉंग्रेसला रामराम करुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हातात बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पिताश्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कॉंंग्रेसची विचारधारा जाेपासली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांना राष्ट्रवादीत येण्याची विनंती केली होती. मात्र, पराभव पत्करावा लागला तरी, त्यांनी कॉंग्रेस पक्षाची विचारधारा शेवटपर्यंत सोडली नव्हती.

विलासकाका उंंडाळकर यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडून राजकारणाचे धडे घेऊन कॉंग्रेसचे विचार जोपासण्याचे काम शेवटपर्यंत केले होते. कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचे त्यांनी तब्बल ३५ वर्षे प्रतिनिधीत्व केले होते. त्यादरम्यान त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तरीही न डगमगता ते काँग्रेस पक्षाचे कार्य करत राहिले, त्यांनी एकेकाळी जिल्ह्यावर वर्चस्व केले. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत त्यांना कॉंग्रेस पक्षांतर्गतच संघर्ष करावा लागला. त्यादरम्यान त्यांना भाजपची ऑफर होती.

विलासकाका उंंडाळकर यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र ॲड. उंडाळकर हे पुढे चालवत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या ताकदीची चुणूक दाखवली होती. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या गटाची भूमिका महत्वाची ठरली होती. सध्याच्या राजकीय परिस्थितीत कॉंग्रेसची राज्यातील ताकद नगण्य झाली आहे, पक्षाला लवकर उभारी मिळेल, असे वातावरणही सध्या दिसत नाही, त्यामुळे भविष्याचा विचार करून ॲड. उंडाळकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत ॲड. उंडाळकर यांची प्राथमिक चर्चाही झाली आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेवुन ते त्यासंदर्भातील निर्णय ते लवकरच जाहीर करणार आहेत. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणमध्ये कॉंग्रेसला पर्यायाने माजी मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात आहे.

मकरंद पाटलांचा पक्षवाढीवर भर

विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवाार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीतील बंडावेळी सातारा जिल्ह्यातून मकरंद पाटील हे एकमेव आमदार त्यांच्यासोबत गेले. त्याबदल्यात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. याशिवाय त्यांच्या भावाला राज्यसभेची खासदारकीही मिळाली आहे. साताऱ्यात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ॲड. उंडाळकर यांना राष्ट्रवादीत घेण्याची प्रक्रिया सध्या सुरु केली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस भक्कम होताना दिसत आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT