Ramdas Athavale
Ramdas Athavale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पवारांच्या घरावरील हल्ल्याची निष्पक्षपणे चौकशी व्हावी : आठवलेंची मागणी

Umesh Bambare-Patil

सातारा ः खासदार शरद पवार यांच्या घरावरील हल्ला दुर्दैवी असून मुळात एसटी कर्मचाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायला हवे होते. या प्रकाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारच जबाबदार असून या हल्ल्याची निष्पक्षपणे चौकशी व्हावी, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. दरम्यान, कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजय होणार असून राज्यातील सरकार पडेल न पडेल पण, 2024 मध्ये राज्यात भाजप व मित्रपक्षाचेच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले जिल्ह्यात आले होते. यावेळी शासकिय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजयी निश्चित असल्याचे सांगून आठवले म्हणाले, दलितांची मते मोदींना मिळत आहे. मुस्लिम महिलांमध्ये ही मोदींविषयी आदराचे स्थान आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडे सोनिया गांधी, प्रियांका गांधी असल्यातरी त्यांना यश मिळत नाही.

त्यामुळे काँग्रेस डाऊन होत असून शिवसेनेवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. सेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठबळावर मुख्यमंत्री पद मिळविलं आहे. 2024 च्या निवडणुकीत केंद्रात भाजपला 400 जागा मिळतील, असे भाकित त्यांनी केले. भाजपसह मित्र पक्षांना 2024 ची चिंता नाही. काँग्रेसमध्ये सध्या असलेली नाराजी पाहता त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढल्यास भाजपला सरकार बनविण्याची संधी मिळेल. पण उरलेल्या दीड वर्षात महाविकासचे सरकार पडेल की नाही हे सांगता येणार नाही. पण २०२४ मध्ये राज्यात आमचेच सरकार येणार आहे.

मनसे भाजपसोबत येण्याच्या विचारात दिसत आहे, याविषयी श्री. आठवले म्हणाले, मनसेला सोबत घेण्याचा निर्णय योग्य होणार नाही. आम्ही भाजपसोबत असल्याने त्यांनी मनसेला सोबत घेऊ नये. कारण मनसेच्या सभेला गर्दी होत असली तरी मते मिळत नाहीत. इंधन दरवाढीविषयी श्री. आठवले म्हणाले, निवडणुकीनंतर इंधनाचे दर कमी होतील. केंद्राकडून तसे प्रयत्न सुरू आहेत. पण राज्यानेही आपले काही कर कमी करावेत. सरकारमध्ये सहभागी असल्याने आम्ही आंदोलन करत नाही.

पण इंधनाचे भाव कमी व्हावेत अशी आमची भूमिका आहे. ईडीच्या कारवाईमागे भाजप असल्याचा आरोप होत आहे, याविषयी मंत्री आठवले म्हणाले, या आरोपात तथ्य नाही, जे चुकीत आहेत त्यांची चौकशी संबंधित संस्थेकडून होत आहे. त्याचा केंद्राशी काहीही संबंध नाही. त्यांना तसे वाटत असेल तर त्यांनी हा मुद्दा न्यायालयासमोर मांडावा. रिपब्लिकन पक्षातील कोणीही ईडीच्या रडारवर नाही. कारण आमचे ईडीशी जमतच नाही, असे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेला हल्ला दुर्दैवी व गंभीर आहे, असे सांगून आठवले म्हणाले, त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायला हवे होते. पण, याची पोलिसांना माहिती हवी होती. पवार साहेब सर्वांसाठी काम करणारा नेता आहे. या हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकारच जबाबदार आहे, पण, या हल्ल्याची निपक्षपातीपणे चौकशी करावी. एसटी विलीनीकरणाची मागणी कठीण नाही, यामुळे सरकारच्या झोळीत धोंडा पडणार नाही.

दोन राजांचा वाद मिटवणार...

सातारच्या दोन राजांमध्ये सध्या संघर्ष सुरू असून दोघेही एकाच पक्षात आहेत. त्या दोघांशी ही माझे जवळचे संबंध आहेत. त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे आठवलेंनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT