Siddhrameshwar Wedding Ceremony Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Gadda Yatra : सिद्धरामेश्वरांच्या विवाह सोहळ्यास निवडणुकीची किनार...

Siddhrameshwar Wedding Ceremony : श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिर परिसरात संमती कट्ट्याजवळ शेकडो वर्षांची परंपरा असलेला नंदीध्वजांचा अक्षता सोहळा रविवारी दुपारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पाडला.

सरकारनामा ब्यूरो

रामेश्वर विभूते

Solapur News : सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील विवाह सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी (ता. १४ जानेवारी) हजारो सोलापूरकरांच्या हजेरीत पार पाडला. यंदाच्या अक्षता सोहळ्यास निवडणुकीची पार्श्वभूमी होती, त्यामुळे राजकीय पक्षांनी सिद्धरामेश्वर यात्रेची संधी साधत प्रचाराचा कार्यभार उरकला. (Attendance of political leaders at Siddharameshwar's wedding ceremony)

श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात संमती कट्ट्याजवळ शेकडो वर्षांची परंपरा असलेला नंदीध्वजांचा अक्षता सोहळा रविवारी दुपारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. हजारो भाविकांनी सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला. पण, यंदाच्या अक्षता सोहळ्यास राजकीय रंग होता. कारण भारतीय जनता पक्ष समर्थक रामभक्तांकडून अक्षता सोहळ्याला अक्षताचे वाटप करताना अयोध्येतील मंदिरात होणाऱ्या रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे पत्रकही वाटण्यात येत होते.

दुसरीकडे, राज्याचा आरोग्य विभाग सांभाळणारे आरोग्य मंत्री तथा शिवसेना नेते तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने सोलापुरातील सिद्धरामेश्वराच्या यात्रेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची छाप या शिबिरावर दिसून आली. हे आरोग्य शिबिरही गड्डा यात्रेत लक्षवेधी ठरले. हे आरोग्य शिबिर नॉर्थकोट प्रशालेच्या मागे उभारण्यात आले होते. यात्रेसाठी आलेल्या अनेक भाविकांनी या आरोग्य शिबिरात तपासणी करून घेतली. आवश्यक त्या लोकांना औषधांचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, आजच्या अक्षता सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार अमर साबळे हे बाराबंदी घालून सहभागी झाले होते. तसेच, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, त्यांची कन्या प्रिती श्रॉफ, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, दिलीप माने, शिवशरण पाटील, सिद्धेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्‍वस्त ॲड. मिलिंद थोबडे यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूरच्या यात्रेसाठी शुभेच्छा संदेश पाठवला होता. त्यांच्या गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि मनीष काळजे उपस्थित होते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार प्रथमच अक्षता सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीची सोलापुरात चर्चा रंगली होती.

संस्कार भारतीच्या वतीने भव्य रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती रेखाटून झेंडूचे ‘तोरण लावा दारोदारी, मंदिर निर्माण होत आहे अयोध्या नगरी’ असा उल्लेख करण्यात आला होता. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते रांगोळ्यांच्या पायघड्यांचे उद्‌घाटन करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT