Bhagirath Bhalke - Anil Sawant-Tanaji Sawant  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tanaji Sawant : तानाजी सावंतांनी अखेर संधी साधलीच : दुरावलेला पुतण्या अन्‌ भगीरथ भालके 12 एप्रिलला शिवसेनेत प्रवेश करणार

Bhagirath Bhalke - Anil Sawant will join Shiv Sena : भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पंढरपूरच्या राजकारणात बदल होण्याची शक्यता असून तानाजी सावंत गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 April : तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूरमध्ये भालके आणि सावंत हे शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यापासून दुरावलेला त्यांचा पुतण्या अनिल सावंत यांना आपल्यासोबत कायम ठेवताना माजी मंत्री सावंत यांनी भगीरथ भालके यांच्यासारख्या जनतेतील नेत्याला आपल्या गटात ओढण्यात यश मिळविले आहे. विधानसभा निवडणुकीपासून गृहकलहात अडकलेल्या तानाजी सावंतांना भगीरथ भालके आणि अनिल सावंतांच्या निर्णयामुळे काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

भालके यांच्या पंढरपूरमधील निवासस्थानी समर्थक कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या बैठकीत शिवसेना प्रवेशाचा निर्णय झाला. भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्यासोबत पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, अनिल सावंत आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

पंढरपूरच्या विकासासाठी सत्ताधारी पक्षासोबत गेले पाहिजे, नाही तर विरोधी पक्षातील नेतेमंडळीसुद्धा आपल्याला विकास करू देणार नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरच्या विकासासाठी आग्रही आहेत, त्यामुळे आपण शिवसेनेसोबत जावे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. ‘तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असणार आहे,’ असे सांगून कार्यकर्त्यांनी भालके यांना निर्णयाचे सर्वाधिकार दिले.

कार्यकर्त्यांसमोर बोलताना भगीरथ भालके म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले, त्या वेळी अनेकांनी भालके संपले, आता त्यांचं काही राहिलं नाही, अशा वल्गना केल्या होत्या. नगरपालिका निवडणुकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पडेल ती भूमिका पार पाडून विजय मिळविला. नगराध्यक्षपदासह ११ नगरसेवक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे निवडून आले. आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार तर महाराष्ट्रात तीन नंबरच्या सर्वाधिक मताधिक्क्यांनी निवडून आला आहे. हे सर्व ऐकीतून साध्य झाले आहे.

राजकारणात त्या त्या भूमिका, राजकीय घडामोडीमुळे होतात, चुकतात. त्या त्या भूमिका दुरुस्त कराव्या लागतात. विधानसभा निवडणुकीत मी, अनिल सावंत आणि दिलीप धोत्रे यांना मिळालेल्या मतांची बेरीज एक लाख ३० हजार होते, तर विजयी उमेदवाराची मताची बेरीज एक लाख २४ हजार इतकी आहे, असे भालकेंनी सांगितले.

ते म्हणाले, जनतेने आपल्याला भरभरून दिलं आहे. पण, मतभेदामुळे ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या दुरुस्त करून आपण पुढे जाणार नाही, तोपर्यंत आपल्या भूमिकेला आणि जनतेला न्याय देता येणार नाही, हे ओळखून नगरपालिका निवडणुकीत एकत्रितपणे निवडणूक लढवून विजयी होऊ शकतो, हे आपण दाखवून दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT