

Pandharpur, 07 April : पंढरपूर शहरातील विकास कामांना गती देण्यासाठी आणि जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी आम्ही सर्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्वतःसाठी कोणतेही पद मागितले नाही. विधानसभेच्या सभागृहात जाईन, तर समोरासमोर लढूनच जाईन, मागच्या दारातून कधीही जाणार नाही, असे खुले चॅलेंज तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांनी नाव न घेता भाजप नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांना दिले.
भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या निवासस्थानी मंगळवारी (ता.7 एप्रिल) प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये शिवसेनेत प्रवेश करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी हात उंचावून भालके यांना शिंदेसेनेत प्रवेश करण्यास समर्थन दिले. त्या बैठकीत भगीरथ भालके यांनी प्रवेशासंदर्भात भूमिका मांडताना विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
भालके म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत पंढरपूरच्या (Pandharpur) नगराध्यक्ष म्हणून शहरातील जनतेने प्रणिता भालके यांना निवडून दिलेले आहे. पण, तालुक्यातील विरोधक विकास कामांमध्ये अडचणी निर्माण करत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंढरपूर शहराच्या विकास करण्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मी स्वतःसाठी कोणतेही पद मागितलेले नाही किंवा मला मागच्या दारातून सभागृहात घ्या; म्हणून मी शिवसेनेते प्रवेश करत नाही.
विधानसभेच्या सभागृहात जाईन तर समोरासमोर लढूनच जाईन, इतरांसारखे मागच्या दारातून कदापी सभागृहात जाणार नाही. विधानसभेच्या 2029 च्या निवडणुकीला अजून खूप अवकाश आहे. या दरम्यान अजून बरेच पाणी पुलाखालून वाहून जाणार आहे. त्यामुळे विरोधकांनी माझ्या उमेदवारीची चिंता करू नये. उमेदवार देणारा आणि घेणारा खंबीर आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
जाणूनबुजून आमच्या नगरसेवकांना त्रास दिला जातोय
पंढरपूर पोलिसांनी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर जाणूनबुजून व राजकीय द्वेषातून गुन्हा दाखल केला आहे. राजकीय हेतूने जर पोलिस गुन्हे दाखल करणार असतील तर आम्हाला पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल, असा इशारा भगीरथ भालके यांनी दिला.
त्या दिवशी नगरसेवक लोकेश यादव बाहेरगावी होते
भिशीच्या वादातून एकावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक लोकेश यादव यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या दिवशी ही घटना घडली. त्या दिवशी नगरसेवक लोकेश यादव हे मित्रांसोबत बाहेरगावी होते. असे असूनही पोलिस जाणूबुजून खोटे गुन्हे दाखल करुन आमच्या नगरसेवकांना त्रास देण्याचे काम करत असल्याचा आरोपही भालके यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.