Bhagirath Bhalke-Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Lok Sabha : ‘तुमचा कार्यक्रम करणं फार अवघड नाही’; भालके समर्थकांचा शिंदेंना खणखणीत इशारा

Bhagirath Bhalke Group News : आम्ही 2014 मध्ये काँग्रेसचे काम करून लोकसभेला शिंदे यांना लीड दिला. काँग्रेसची अधिकृत उमेदवारी घेऊनही पक्षाचे पंढरपूर शहर आणि मंगळवेढा तालुक्यातील काही पदाधिकारी गळ्यात कमळाचे पंचे घालून आमच्या विरोधात फिरले. आम्हाला पाडण्यासाठी धडपडले.

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 15 April : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके यांची भेट घेतली होती, त्यामुळे भालकेंचे काही समर्थक प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. मात्र, भगीरथ भालके यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, काँग्रेसचा मागचा अनुभव तेवढासा चांगला नाही. तुम्ही जर ठोस भूमिका घेऊन पुढे येणार नसाल, तर आम्हालाही ठोस भूमिका घेऊन शांत बसायला किंवा कार्यक्रम करायला फार अवघड जाणार नाही, असा इशारा भालके समर्थकाने सोशल मीडियातून शिंदेंना दिला आहे.

भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निसटता मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर ते काही दिवस अज्ञातवासात होते. त्याचदरम्यान विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) पाटील यांना पंढरपूरच्या उमेदवारीचे संकेत दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अभिजित पाटील यांचे वाढलेले महत्व आणि पक्षाकडून होणारे दुर्लक्ष यामुळे भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर गाजला होता. मात्र, तेलंगणामध्ये बीआरएसचा दारूण पराभव झाल्याने भालके हे आता विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेचे नेते तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून त्यांना ऑफर येत आहे.

सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे लोकसभा निवडणुकीत भालके समर्थकांनी काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. मात्र, भगीरथ भालके यांना काँग्रेसच्या नेत्यांकडून विधानसभेसाठी मिळत नाही. त्यामुळे भालके स्वतः काँग्रेसपासूनही चार हात लांब आहेत. या परिस्थितीत भालके समर्थकाने सोशल मीडियातून पोस्ट करत सूचक इशारा दिला आहे.

त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सुशीलकुमार शिंदे यांनी भालके गटाला गृहीत धरू नये. आम्ही भाजपसोबत जाणार नाही; म्हणून तुमच्या सोबत फरफटत येऊही अपेक्षा सोडा. तसे काही होणार नाही. आम्ही स्वाभिमान जपून राजकारण करणारा गट आहे. आम्ही 2014 मध्ये काँग्रेसचे काम करून लोकसभेला शिंदे यांना लीड दिला. काँग्रेसची अधिकृत उमेदवारी घेऊनही पक्षाचे पंढरपूर शहर आणि मंगळवेढा तालुक्यातील काही पदाधिकारी गळ्यात कमळाचे पंचे घालून आमच्या विरोधात फिरले. आम्हाला पाडण्यासाठी धडपडले.

मित्रपक्षाची उमेदवारी असूनही 2019 मध्ये पुन्हा तोच धोका काँग्रेसकडून झाला. काँग्रेस आमच्या विरोधात एबी फॉर्म देऊन उमेदवार दिला. आता ती चूक करू नका. आमच्यापेक्षा तुम्ही जास्त होरपळून निघाल, हे लक्षात घ्या. भालके गट नाही म्हटले तरी मंगळवेढा तालुक्यात सगळ्यात मोठा जनाधार असणारा गट आहे. पंढरपूरची 22 गावे, पंढरपूर शहर आणि मोहोळ तालुक्याला जोडलेला सरकोली आणि पुळुज भाग आणि चौदा गावे एवढ्या ठिकाणी कार्यकर्ते आणि प्रभाव राखून आहेत, असा इशारा भालके गटाने दिला आहे.

आमचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रणिती शिंदे यांच्या प्रचार दौऱ्यात सामील झाले असले तरी ते आमच्यापासून फारकत घेऊन गेले आहेत, असे नाही. तसे समजूही नका. आम्ही लोकशाही मानतो. आम्ही त्यांच्या मताची कदर करतो; म्हणून त्यांना तसा कुठलाही आम्ही आदेश दिला नाही. तुम्ही जर ठोस भूमिका घेऊन पुढे येणार नसाल, तर आम्हालाही ठोस भूमिका घेऊन शांत बसायला किंवा कार्यक्रम करायला फार अवघड जाणार नाही, असा इशारा पोस्टमधून दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT