Ajit Pawar-Hasan Mushrif
Ajit Pawar-Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : ‘आरएसएस’च्या आरोपाला मुश्रीफांचे सडेतोड उत्तर; ‘यूपीत तर अजितदादा गेले नव्हते....’

Vijaykumar Dudhale

Kolhapur, 14 June : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला फटका बसला, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्रातून करण्यात आला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘उत्तर प्रदेशमध्ये तर अजित पवार गेले नव्हते, मग तिथे भाजपच्या जागा कशा कमी झाल्या’, असा टोला मुश्रीफ यांनी भाजप आणि संघाला लगावला आहे.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मध्ये कोणीतरी लेख लिहून अजित पवारांना (Ajit Pawar) सोबत घेतल्यामुळे भाजपला कमी जागा मिळाल्या, असे म्हटले आहे, त्याबाबतच्या बातम्या गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वर्तमान पत्रातून येत आहेत. त्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि पक्षाच्या प्रवक्त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशमध्येही लोकसभेच्या जागा कमी झाल्या आहेत. त्या ठिकाणी तर अजित पवार गेले नव्हते. तिथं तर अजित पवार यांचा संबंध नव्हता. एकंदरित देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती मान्य करून आगामी विधानसभा निवडणुकीत आपण दुरुस्ती केली पाहिजे, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील यांच्यावर विधानावरही मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, इकडे ते जिंकले, तर लोकांनी कौल दिल्यामुळे आणि तिकडे आम्ही जिंकलो तर धनशक्तीमुळे असं म्हणायचं असतं. ही लोकशाहीमध्ये रूढ झालेली पद्धत आहे.

भारतीय जनता पक्ष सर्वांत मोठा पक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत सहाजिकच त्यांना जास्त जागा मिळणार आहेत. शिंदे गट आणि आमच्या पक्षाला सध्या आहे, त्या जागा मिळणारच आहेत. शिवाय निवडून येण्याची ज्यांची क्षमता असेल, त्याला तिकीट मिळणार आहे. निवडणुकीपूर्वी जागा वाटपाबाबत चर्चा या होतच असतात. पण, जागांवरून महायुती कोणताही विसंवाद नाही, असा दावाही मुश्रीफ यांनी केला.

शक्तीपीठ मार्ग रद्द करण्यासाठी मंत्रिपदाची सर्व ताकद लावणार

शक्तीपीठ महामार्गासंदर्भात यापूर्वीच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला असून हा महामार्ग उपयोगाचा नसल्याचे सांगितलं आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन जाणार असून निवडणुकीत फार मोठा फटका बसला आहे. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे. मंत्री म्हणून लागल तेवढी ताकत लावून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT