P.N. Patil-satej patil-Chetan Narke-Chandrdeep Narke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : कोल्हापूर-करवीर; चेतन नरकेंचे डावपेच वाढविणार महायुती अन् महाविकास आघाडीची डोकेदुखी...

Rahul Gadkar

Kolhapur, 21 March : करवीर विधानसभा मतदारसंघ हा शहराच्या जवळ असला तर राजकारणात संयमी मतदारसंघ म्हणून ओळख आहे. आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यातच पारंपरिक कुस्ती रंगत आली आहे. नरके आणि पाटील गट दोन्हीही तुल्यबळ आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत जवळपास पंधरा ते सतरा हजार मतांनी आमदार पी. एन. पाटील निवडून आले आहेत. त्यांना आमदार सतेज पाटील यांची गगनबावडा तालुक्यातून मिळालेली रसद फायदेशीर ठरली.

पारंपरिक काँग्रेस विचाराची धारा जोपासत आमदार पाटील यांच्यासोबत कार्यकर्तेही आजही कार्यरत आहेत. शिवसैनिकांची मोठी फळी या मतदारसंघात आहे. जिल्ह्याच्या राजकारणात उघडउघड चर्चेत राहण्यापेक्षा पडद्यामागून सूत्रे हलविण्यात करवीरच्या लोकप्रतिनिधींचा मोठा हातखंडा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. लोकसभेच्या विजयासाठी महत्त्वाचा व मताधिक्क्य देणारा हा मतदारसंघ असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीत एकगठ्ठा मतदान देणारा हा विधानसभा मतदारसंघ असला तरी गेल्या पाच वर्षांत ग्रामीण भागात भाजपने अधिक पेरणी केली आहे. गावागावांत जाऊन कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडूनही या मतदारसंघात विधानसभेच्या जोडण्या सुरू आहेत.

गेल्या विधानसभेला काँग्रेसमधून पी. एन. पाटील व सतेज पाटील एकत्र होते. गगनबावडा तालुक्यातील आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांची रसद आमदार पी. एन. पाटील यांना मिळाली होती. आमदार पी. एन पाटील आणि माजी आमदार नरके यांचे सव्वा-सव्वा लाख मतदान लोकसभेच्या उमेदवाराला मताधिक्क्य देणारे ठरणार आहे.

संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाल्यास भाजप व चंद्रदीप नरके यांचा शिवसेना गट, विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष अशी ताकद असेल, तर काँग्रेसमधून (Congress) श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसचे उमेदवार असल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांची ताकद व प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवाय करवीर विधानसभा मतदारसंघात राजर्षी शाहू महाराज यांच्या नावामुळेच हरितक्रांती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शाहू छत्रपती घराण्यातील नाव हे सर्वांना परिचित आहे. मात्र, स्वतः शाहू महाराज यांचा फारसा संपर्क नाही.

समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी मिळाल्यास करवीर-पन्हाळा-गगनबावडा तालुक्यात त्यांचा फारसा संपर्क नाही. घाटगे यांना अधिकाधिक मतदान देण्यासाठी नरके यांना जास्त ताकद लावावी लागेल. तर महाविकास आघाडीतून इच्छुक असलेले गोकुळ दूध संघाचे चेतन नरके यांची भूमिका या मतदारसंघात निर्णायक आहे. चेतन नरके यांचा पारंपरिक मतदार या मतदारसंघात असून, तेही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्याचा फटका महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

महाडिक गटाने गगनबावडा तालुक्यात केलेली घुसखोरी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. जनसुराज्य पक्षाने संताजी घोरपडे यांच्या रूपाने या मतदारसंघात तयारी ठेवली आहे. अनेक विविध कार्यक्रम घेत त्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाही फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून लोकसभेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिवाय काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊन त्याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Vijay dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT