kolhapur News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गटानेही दावा केला आहे. या तीनही पक्षांतून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांनी ठेवली आहे. पण, चेतन नरके यांच्याकडे हे तीनही पक्ष पर्याय म्हणून पाहत आहेत. महाविकास आघाडीकडे सध्या तरी सक्षम उमेदवार नाही. तरीही त्यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. (Chetan Narke's preparation for Kolhapur Lok Sabha Constituency)
कोल्हापूर मतदारसंघातील १२५५ गावांपैकी जवळपास पूर्णच गावे चेतन नरके यांनी पिंजून काढली आहेत. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेला सामोरे जायचं, असा चंग बांधलेल्या चेतन नरकेंची वाटचाल महाविकास आघाडीच्या भूमिकेमुळे खडतर बनत चालली आहे. त्यातही राष्ट्रवादीला खिंडार पडल्यानंतर मनात ठेवलेल्या बेरजेच्या राजकारणाला तडा गेला आहे. त्यामुळे चेतन नरकेंचं काय होणार? अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर राज्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. बदललेल्या राजकीय परिस्थितीत जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण? या जागा कोणत्या पक्षाला जाणार, हे अद्याप निश्चित नाही.
काँग्रेसने पुणे येथे झालेल्या बैठकीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादीनही या दोन मतदारसंघांवर दावा केला आहे. विद्यमान खासदार सेनेचे असल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाने कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र, या तिघांच्या दाव्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके इच्छुक आहेत. या तीन पक्षांपैकी ही जागा कोणाच्या जरी वाटणीला गेली तर नरके यांची लढण्याची तयारी आहे. पण, सध्या तरी नरके यांना जिल्ह्यातील प्रमुखांनी ऑप्शन म्हणून पाहिले आहे.
कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मेळावा झाला होता. मेळाव्यात शिवसैनिकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत उपरा उमेदवार नको. निष्ठावंत शिवसैनिकाला संधी द्या, अशी भूमिका मांडली होती. मुंबईमधील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला नरके कुटुंबीयांनी लावलेल्या उपस्थितीमुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकारणाला नवीन वळण मिळाले आहे.
जागा कोणाच्या वाट्याला?
कोल्हापूर लोकसभेची जागा महायुतीमध्ये शिंदे गटाकडे राहण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असली तरी काँग्रेचे नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्याची मागणी केली आहे. मतदारसंघातील सद्यःस्थिती पाहता ठाकरे गटाकडे सध्या तरी ताकदवान उमेदवार नाही. काँग्रेसकडेही अद्याप उमेदवाराचा चेहरा नसला तरी आमदार सतेज पाटील हे महायुतीला टक्कर देण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जागा महाविकास आघाडीमध्ये कोणाकडे जाणार, हेही पाहणे गरजेचे आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाला नरकेंची हजेरी
गेल्या सहा महिन्यांत महाविकास आघाडीच्या वतीने प्रत्येक पक्षाचे कार्यक्रम वेगवेगळे झाले. या कार्यक्रमाला चेतन नरके यांची उपस्थिती चर्चेचा विषय होते. काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्या राजीव गांधी स्मृतीनिमित्त सद्भावना दौड कार्यक्रमात नरकेंची उपस्थिती होती, तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कोल्हापूरच्या सभेत नरकेंची उपस्थिती होती.
लोकसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांची भेट
चेतन नरके यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केल्यानंतर त्यांचा कल महाविकास आघाडीकडे राहिला आहे. आघाडीकडून उमेदवारी दिल्यास लढण्याची तयारी चेतन नरके यांनी दर्शवली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांचे वडील ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरकेही उपस्थित होते.
संजय राऊत यांनी घेतली भेट
खासदार संजय राऊत यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी डॉ. चेतन नरके यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. बंधू माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिंदे गटात गेल्यानंतर चेतन यांची भेट राऊत यांनी घेतल्याने आगामी निवडणुकीत चंद्रदीप नरके यांच्या विरोधात योग्य पर्याय असतील का? अशीही चर्चा आहे.
मुश्रीफांच्या साक्षीने अजित पवारांशी बंद खोलीत चर्चा
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी, अशी मागणी चेतन नरके यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती. महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेते असताना पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी अजित पवारांनी नरके यांच्या घरी भेट देऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बंद खोलीत चर्चा केली होती. त्यावेळी पवारांनी उमेदवारीकडून नरके यांची कानउघाडणी केली होती. ‘राजकारणात पडू नको, आणखी एक कारखाना उभा कर’, असा सल्ला नरके यांना दिला होता. मात्र, आता राष्ट्रवादीत दोन गट पडल्यावर नरके यांची गोची झाली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.