Karad, 16 March : कऱ्हाड पंचायत समितीच्या सभापतिपदी कऱ्हाड दक्षिणमधील आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थक विंग गणातील भाजपच्या सदस्या नंदाताई यादव यांची, तर उपसभापतिपदी कऱ्हाड उत्तरमधील आमदार मनोज घोरपडे यांच्या समर्थक वाघेरी गणातील भाजपच्या अनिता वेताळ यांची निवड झाली. विरोधी गटाकडून सभापतिपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कालवडे गणातील स्वाती थोरात यांनी, तर उपसभापतिपदासाठी कॉंग्रेसकडुन वारुंजी गणातील सदस्य रवींद्र बडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना संख्याबळाअभावी यश मिळाले नाही. कऱ्हाड पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे.
कऱ्हाड पंचायत समितीच्या (Karad Panchayat Samiti) सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे याच्या अध्यक्षतेखाली सभापती, उपसभापतींच्या निवडी आज (ता. १६ मार्च) झाल्या. सभापती आणि उपसभापतिपदासाठी भाजपकडून कऱ्हाड दक्षिणमधून आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थक सदस्या नंदाताई यादव यांनी, तर कऱ्हाड उत्तरमधून आमदार मनोज घोरपडे यांच्या समर्थक सदस्या आणि हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या वहिनी अनिता वेताळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर समर्थक सदस्या स्वाती थोरात यांनी, तर उपसभापतिपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांचे समर्थक रवींद्र बडेकर यानी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी हात वर करुन मतदान घेतले. भाजपच्या यादव यांना १३, तर राष्ट्रवादीच्या थोरात यांना दहा मते मिळाली. सभापतिनिवडीवेळी कॉंग्रेसचे सदस्य संग्राम पवार हे तटस्थ राहिले.
उपसभापतिसाठी भाजपच्या वेताळ यांना १३ मते मिळाली, तर कॉंग्रेसचे (Congress) रवींद्र बडेकर यांना ११ मते मिळाली. त्यामुळे भाजपच्या यादव आणि वेताळ यांची अनुक्रमे सभापतिपदी आणि उपसभापतिपदी निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी म्हेत्रे यांनी केली.
कऱ्हाड पंचायत समितीच्या निवडणुकीत २४ जागांपैकी भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे आज सभापती-उपसभापती निवडीतही भाजपनेच बाजी मारली. निवडीनंतर आमदार घोरपडे, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड सुरेश भोसले यांनी पंचायत समितीत येऊन सभापती, उपसभापती यांचा सत्कार केला.
कॉंग्रेसचे एक सदस्य राहिले तटस्थ
कऱ्हाड पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ॲड. उंडाळकर समर्थक सदस्या स्वाती थोरात यांनी, तर उपसभापतिपदासाठी माजी मुख्यमंत्री चव्हाण आणि कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांचे समर्थक रवींद्र बडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. सभापती, उपसभापतिपदासाठीच्या मतदानावेळी राष्ट्रवादीच्या थोरात यांना ११ ऐवजी दहाच मते मिळाली.
कॉंग्रेसचे सदस्य संग्राम पवार हे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या श्रीमती थोरात या उमेदवार असल्याने पवार यांनी त्यांना मतदान केले नाही. ते तटस्थ राहिल्याने श्रीमती थोरात यांचे एक मत कमी झाले. उपसभापतिसाठी कॉंग्रेसच्या बडेकर यांना ११ मते मिळाली. त्यावेळी पवार यांनी कॉंग्रेस हा महाविकास आघाडीतील पक्ष असल्याने आणि ते स्वतः कॉंग्रेसचे सदस्य असल्याने त्यांनी मतदान केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.