

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे यांचं होमग्राऊंड असलेल्या जावळी पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत भाजपच्या सौरभ शिंदे यांचा एका मताने विजय झाला. शिंदे यांच्या भावजय आणि राष्ट्रवादीच्या एकमेव पंचायत समिती सदस्या शिल्पा शिंदे सभापती निवडीवेळी तटस्थ राहिल्या. त्यामुळे शिवसेनेला ईश्वरचिठ्ठीवर असलेली विजयाची संधीही घेता आली नाही.
जावळी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले सकाळी 10 वाजताच मेढ्यात दाखल झाले. त्यांनी नाट्यमय घडामोडी घडवत भाजपाचा सभापती आणि उपसभापती करत शिवसेनेला चांगलाच धोबीपछाड दिला. या निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती सौरभ शिंदे यांना डबल सीट घेत मेढ्यात बुलेटसवारी केली.
जावळी तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी आघाडीत निवडणूक लढवली होती. निकालात भाजपला 3 आणि शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीलाही 3 जागा मिळाल्या. समसमान बलाबल झाल्याने ईश्वरचिठ्ठीवर सभापती आणि उपसभापती निवड होणार होती. या निवडीसाठी शिवेंद्रसिंहराजे सकाळी मेढ्यात दाखल झाले, त्यावेळीच वातावरण फिरणार असा संदेश गेला होता.
पंचायत समितीमध्ये ठाण मांडून बसलेल्या शिवेंद्रसिंहराजे यांनी शिवसेनेला उपसभापती पद देण्याची तयारी दर्शवली, परंतु शिवसेनेचे नेते अंकुश कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांना याबाबत कोणतीही तडजोड न करण्याबाबत सांगितले. शेवटी सभापती पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे यांना तटस्थ ठेवण्यात भाजपला यश आले.
शिल्पा शिंदे यांनी ऐनवेळी तटस्थ भूमिका घेतल्याने शिवसेनेचा एका मताने पराभव झाला. या घडामोडींनंतर जावळी तालुक्याच्या राजकारणात केंद्रस्थानी येण्याची संधी असलेल्या शिवसेनेला रणनीतीत अपयश आले. आता शशिकांत शिंदे यांच्यासाठी हा धक्का आहे की ही त्यांचीच भाजपपुरक भूमिका आहे याबाबत सस्पेन्स कायम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.