Deepak Salunkhe-Shahajibapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapus Tension Increased : दीपक साळुंखेंनी वाढविले शहाजीबापू पाटील यांचे टेन्शन

Sangola politics : मी फार मोठं बोलणारा पुढारी नाही. जेवढं झेपतंय, जेवढं करता येईल, तेवढं करणारा मी आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur News : अनेकांना आमदार करण्यात मी माहीर आहे. कोणी जागतिक विक्रम केले असतील, तेसुद्धा दीपक साळुंखेंच्या सहकार्यानेच. काहींना आबदत निबदत का होईना आमदारकी मिळाली, तीही माझ्यामुळंच. आता कार्यकर्ते म्हणतात, आबा आता दुसऱ्यासाठी करायचं बास करा. आता आपण यामध्ये उतरलं पाहिजे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) दीपक साळुंखे यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. त्यामुळे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांचे मात्र टेन्शन वाढणार आहे. (Deepak Salunkhe increased the tension of Shahajibapu Patil)

पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील कार्यक्रमात माजी आमदार दीपक साळुंखे बोलत होते. त्यावेळी त्यांनी आमदारकीच्या निवडणुकीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, पंढरपूर तालुक्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तालुक्याचे उभे तुकडे पडले आहेत. तालुक्याचा काही भाग मोहोळ, काही भाग मंगळवेढा, काही गावे माढा, तर काही गावे सांगोला मतदारसंघाला जोडली आहेत. या तालुक्याचे आता पाच तुकडे आणि पाच आमदार झाले आहेत.

मी एकदा पंढरपूर तालुक्याची आमसभा आमदार म्हणून घ्यायला लावली. या तालुक्याला कधी आमसभाच होत नव्हती. आमसभेला चार आमदार आणि मी पाचवा आमदार. पण, कोणी काही विचारायच्या आत अवघ्या अर्ध्या तासात सभा गुंडाळली आणि सर्वजण जिकडं तिकडं निघून गेले, अशी या पंढरपूर तालुक्याची अवस्था आहे. तुमचा भाग सांगोला तालुक्याला जोडलेला आहे. मी पूर्वी फारसं येत नव्हताे. पण मी आता तुम्हाला शब्द देतो की, भाळवणी गटात दीपक साळुंखे तुम्हाला विकासकामांच्या निमित्ताने वारंवार आलेले दिसतील, असे साळुंखे यांनी नमूद केले.

माजी आमदार साळुंखे म्हणाले की, मी फार मोठं बोलणारा पुढारी नाही. जेवढं झेपतंय, जेवढं करता येईल, तेवढं करणारा मी आहे. आता तुम्ही (उपरी ग्रामस्थांनी) एका साळुंखेंना मुख्याध्यापक करून त्याच्या नादाला लागल्यावर गाव कसं चांगलं होतं, हे बघितलं आहे. आता दुसऱ्या साळुंखेंच्या नादाला लागा, तालुका कसा चांगला होतोय, हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही.

खासदार कधी पंढरपुरात येत नाहीत, असे सांगितलं गेलं, पण मी कधी कोणाला नावं ठेवणारा माणूस नाही. दुसऱ्याला नावं ठेवून कधीच मोठं होत येत नाही. ज्याचं त्याचं काम चालेलं असतं. सांगोला तालुक्याच्या विकासाबाबत मी आणि शहाजीबापू पाटील मिळून काम करतो. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते, असेही त्यांनी सांगितले.

मी अजितदादांसोबत जाऊनही पवारसाहेब माझ्या ऑफिसमध्ये आले

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाल्यानंतर दीपक साळुंखे कोणाकडे जाणार, असं लोकांना वाटत होतं. सगळ्यांनाच वाटत होतं की, मी आता शरद पवारांकडे जाणार. पवार हे आजही माझे दैवत आहेत. मी अजित पवारांसोबत गेलो, तरी शरद पवार जेव्हा सांगोल्यात गणपतराव देशमुखांच्या कार्यक्रमाला आले होते, तेव्हा ते माझा सत्कार तरी घेणार की नाही, असं वाटत होतं. पण, ते थेट माझ्या ऑफिसमध्ये आले, कपडे बदलले आणि त्यानंतर कार्यक्रमाला गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT