Dhairyasheel Mohite Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil Group News : रणजितदादा दिल्लीत; धैर्यशील मोहिते पाटलांकडून प्रचाराला सुरुवात, माढ्यात भाजपची अडचण वाढणार

Madha Loksabha Constituency : मोहिते पाटील हे माढ्यातून कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लोकसभा लढवणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे दिल्लीत असल्याचे समजते. ते दिल्लीत काय सूत्रे हलवतात आणि उमेदवारीचा काय निर्णय होतो, हेही पाहणे महत्त्वाचे आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 19 March : अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावरील ‘डीनर डिप्लोमसी’ आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची भेट यामुळे मोहिते पाटील यांची माढ्यात काय भूमिका असणार, याची उत्सुकता असतानाच आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे.

एकीकडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे दिल्लीत असताना धैर्यशील यांनी गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे माढ्याच्या रणांगणात उतरण्याचे ‘धैर्य’ मोहिते पाटील दाखवणार आणि भाजपची अडचण वाढवणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) यांनी आपला माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सुरुवात कट्टर विरोधक आमदार संजय शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या करमाळ्यातून (Karmala) केली आहे, त्यामुळे मोहिते पाटील हे माढ्यातून कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लोकसभा लढवणार याची उत्सुकता आहे.

दरम्यान, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे दिल्लीत असल्याचे समजते. ते दिल्लीत काय सूत्रे हलवतात आणि उमेदवारीचा काय निर्णय होतो, हेही पाहणे महत्त्वाचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजपकडून डावलण्यात आल्यानंतर रविवारी अकलूजमधील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर सकाळी डीनर डिप्लोमसी आणि संध्याकाळी राजकीय ड्रामा रंगला.

डीनर डिप्लोमसीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, जयवंतराव जगताप, सांगोल्याचे डॉ. बाबासाहेब आणि डॉ. अनिकेत देशमुख उपस्थित हेाते. त्यामुळे मोहिते पाटलांचे राजकीय शक्तिप्रदर्शन महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले.

‘शिवरत्न’वरील ‘डीनर डिप्लोमसी’मध्ये नेमकं काय ठरलं, याची चुणूक आज सकाळीच आली. माढ्यासाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज सकाळपासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली. करमाळ्यातील कमलाभवानी मातेचे दर्शन घेऊन धैर्यशील यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली आहे.

त्यानंतर करमाळा शहरातील सुनील सावंत यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली, त्या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांची राजकीय विषयासह आगामी धोरणात्मक बाबींवर चर्चा केली. या ठिकाणी करमाळ्यातील नगरसेवकांसह शहरातील महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते.

मोहिते पाटील हे निंबाळकर यांच्या उमेदवारीवर प्रचंड नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे रविवारी शिवरत्नवर आले होते. त्या नाराजीची स्पष्टता गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना शिवरत्न बंगल्यावर जमा झालेल्या मोहिते पाटील समर्थकांनी निंबाळकरांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर आली होती. माढा आणि निंबाळकरांना पाडा, अशा घोषणांनी महाजन यांचे स्वागत झाले होते.

मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून परत जात असताना मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली होती. माढा लोकसभेच्या उमेदवारीसंदर्भात शब्द द्यावा, अशी त्यांची मागणी होती. मात्र, तसा शब्द दिला तर मीच अडचणीत येईल, अशी कबुली महाजन यांनी दिली होती. मात्र, विजयदादांची नाराजी आपण पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालू, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT