Dilip Mane-Dharmaraj Kadadi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur South : दक्षिणेतील नाट्यमय घडामोडीत काँग्रेस घायाळ; काडादींचा नकार, मानेंना घ्यावी लागली माघार...

Assembly Election 2024 : धर्मराज काडादी हे माघार घेतील, असे माने आणि शिंदे यांना वाटत होते. तशी विनंतीही त्यांनी काडादी यांना केली. मात्र, माघार घेण्यास काडादी यांनी ठामपणे नकार दिला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 04 November : सोलापूर दक्षिण मतदारसंघात अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ज्या मातब्बर दिलीप माने यांना महाविकास आघाडीकडून विशेषतः काँग्रेसकडून उमेदवारीची अपेक्षा होती, त्याच माने यांना अखेरच्या दिवशी निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. विशेष म्हणजे सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे सोलापूर दक्षिणमध्ये महायुतीचे सुभाष देशमुख, महाविकास आघाडीचे अमर पाटील आणि धर्मराज काडादी या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून (Solapur South Constituency) महाविकास आघाडीकडे विशेषतः काँग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी होती. त्यातही माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, उद्योजक महादेव कोनगुरे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री हे प्रमुख इच्छूक होते. शिवसेनेकडून अमर पाटील यांचे नाव लोकसभा निवडणुकीपासूनच चर्चेत होते.

महाविकास आघाडीकडून सोलापूर दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्या वेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर दोन दिवसांत जाहीर झालेल्या काँग्रेसच्या यादीत माने यांचे नाव जाहीर झाले.

दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, अखेरपर्यंत एबी फार्मच देण्यात आली नाही, त्यामुळे माने हे नाराज झाले होते. त्यामुळे ते अपक्ष लढण्यावर ठाम राहतील, असे वाटत असतानाच खासदार प्रणिती शिंदे यांनी माने यांनी समजूत काढण्यात यश आले. धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi) हे माघार घेतील, असे माने आणि शिंदे यांना वाटत होते. तशी विनंतीही त्यांनी काडादी यांना केली. मात्र, माघार घेण्यास काडादी यांनी ठामपणे नकार दिला.

काडादी यांनी माघार घेण्यास नकार दिल्यामुळे खासदार प्रणिती शिंदे आणि दिलीप माने यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपू शकली नाही, त्यामुळे अखेर दिलीप माने यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघातून भरलेला अर्ज अखेर मागे घेतला. माने यांनी माघार घेतली असली तरी काडादी यांचा अर्ज कायम आहे. त्याचा फायदा अमर पाटील यांना मिळण्याऐवजी सुभाष देशमुखांनाच होण्याची शक्यता आहे

दरम्यान, दिलीप माने हे सोलापूर दक्षिण मतदारसंघात कोणाला पाठिंबा देतात, हे पाहावे लागेल. महाआघाडीचा धर्म पाळून माने हे पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार की अपक्ष काडादी यांना बळ देणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून आज पंधरा उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता महायुतीचे सुभाष देशमुख, महाविकास आघाडीचे अमर पाटील, मनसेचे महादेव कोगनुरे, प्रहार पक्षाचे बाबा मिस्त्री आणि अपक्ष धर्मराज काडादी हे प्रमुख उमेदवार रिंगणात असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT