Satara, 25 May : सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर खासदार उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांची बैठक घेतली होती. त्यानंतर दोन्ही राजेंनी सर्व नगरसेवकांची एकत्रित बैठक घेत आता आघाड्यांचा विषय राहिलेला नाही, आपण सर्वजण भाजपच्या चिन्हावर निवडून आलो आहोत, याचे भान ठेवा, अशा सूचना नगरसेवकांना दिल्या. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणाच्याही अर्जावर सह्या करू नका, सही करण्यापूर्वी आमच्याशी बोला, असेही स्पष्ट केले.
दोन्ही राजेंच्या गटातील नगरसेवकांमध्ये नगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून धूसफूस सुरू आहे. बांधकाम सभापती खंदारे यांनी उपनगराध्यक्ष बनकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून खुद्द उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रसंगी विरोधात बसा; पण अपमान सहन करू नका, असे विधान समर्थक नगरसेवकांच्या बैठकीत केले होते.
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे (shivendraraje) यांच्या उपस्थितीत रविवारी दोन्ह गटातील नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. त्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही दोन्ही राजेंनी आपल्या नगरसेवकांना काही सूचना केल्या आहेत. सांगली- सातारा विधानपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेच्या अनुषंगाने कोणाच्याही अर्जावर सह्या करू नका. सही करण्यापूर्वी आमच्याशी बोला, असे स्पष्ट केले आहे. ते करताना या जागेसाठी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य धैर्यशील कदम यांची नावे सुचविल्याचेही दोन्ही राजेंनी या वेळी जाहीर केले.
नगरपालिकेच्या कामकाजादरम्यान कोणताही वाद होणार नाही, याची काळजी घ्यावी. सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडी असा विषय आता राहिलेला नाही. आपण सर्वांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे. सभेपूर्वी बैठका घ्या आणि चर्चा करा. त्यातून तोडगा निघत नसेल तर आमच्याशी बोला, आम्ही मार्ग काढून देऊ, असे खासदार उदयनराजे भोसले आणि बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
जुन्या नगरसेवकांनी नव्या नगरसेवकांना कामकाजात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. नव्या नगरसेवकांचा वापर गटबाजीसाठी न करता त्यांना कामकाजातील आयुधे कशी वापरायची, वार्षिक सभेत कसं वागायचं, याबाबत मार्गदर्शन करा, अशाही सूचना उदयनराजे यांनी केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.