Vishal Patil-Vishwajeet kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Loksabha : ‘विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली सांगली लोकसभा लढणार; यंदा कोणतीही कसर ठेवणार नाही’

सरकारनामा ब्यूरो

अनिल कदम

Sangli News : नेतृत्वावरून अनेक पक्षांमध्ये मतभेद दिसून येतात. पण, आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे, असे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्पष्ट केले. भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे, त्यामुळे यंदा यशाची खात्री असल्याचा विश्वासही व्यक्त केला. (Dr. Vishal Patil will contest Sangli Lok Sabha under the leadership of Vishwajeet Kadam)

विशाल पाटील यांनी खानापूर तालुक्यातील नागेवाडी, भाळवणी आणि लेंगरे जिल्हा परिषद गटाचा दौरा करीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यात पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार संजय पाटील आणि भारतीय जनता पक्षाबद्दल सांगलीत प्रचंड नाराजी दिसून येत आहे. यावेळी आम्ही कसलीही कसर न ठेवता निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्याशी पूर्णपणे चर्चा झाली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली या लोकसभा निवडणुका लढवणार आहोत. काँग्रेस पक्षात आता कसलाही विसंवाद नाही. तसेच, मित्रपक्षही आमच्यासोबत आहेत, असा दावा पाटील यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, ‘प्रत्येकाला जागा मागण्याचा अधिकार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बहुजन वंचित आघाडी हे दोन्ही पक्ष सध्या या जागेवर दावा करत असले तरी आमच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो. परंतु कसल्याही परिस्थितीत सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असून काँग्रेसने तसे इंडिया आघाडीला कळवले आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण उमेदवारी करण्यास आग्रही आहोत.’

इंडिया आघाडीची एक व्यापक बैठक घेऊन सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन सविस्तरपणे आपली भूमिका मांडण्यासाठी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करणार आहोत. मागील वेळी तयारी करण्यासाठी आपणाला फार कमी अवधी मिळाला. त्यातच बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार असल्याने मतांची विभागणी झाली आणि तेच भाजपच्या पथ्यावर पडले. परंतु आता तसे होणार नाही. आता काँग्रेस पक्ष एकसंघपणे लढेल आणि सर्व मित्र पक्षांची साथ मिळेल. राज्यात एक दोन जागा वगळता सर्व जागांचा तिढा सुटला आहे, त्यामुळे कसल्याही परिस्थितीत सांगली लोकसभेवर या वेळी काँग्रेस पक्ष विजयी होईल.

महायुतीतच कुरबुरी सुरू आहेत. त्यांच्या उमेदवाराबद्दल त्यांच्या खासदाराबद्दल त्यांना विश्वास वाटत नाही. त्यामुळे उमेदवार बदलण्याच्या हालचाली महायुतीत सुरू आहेत. परंतु आम्ही कसल्याही आमिषाला बळी न पडता काँग्रेस पक्षाच्या वतीने ही निवडणूक लढणार आहोत. (स्व.) वसंतदादा पाटील, (स्व.) डॉ. पतंगराव कदम यांनी या परिसरात कार्यकर्त्यांचे जाळे विणले, त्यांनी प्रचंड काम केले. तसेच (स्व.) खासदार प्रकाशबापू पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील यांनीही या परिसरात त्यांच्या त्यांच्या काळात मोठी कामे केली आहेत. सध्या आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून त्याचे रूपांतर विजयात करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही.

विशाल पाटील यांच्यासोबत विटा शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, शिवप्रताप पतसंस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे, बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत चव्हाण, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष मनोज देवकर, काँग्रेसचे युवक नेते गजानन सुतार होते.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT