Balasaheb Sarvade killed in sword attack Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Balasaheb Sarvade Murder : बाळासाहेब सरवदेंनी पहिला वार शिताफीने चुकवला; पण तलवारीचे दोन छातीवर झाले अन्‌...

Solapur Corporation Election 2026 : बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात सोलापूर गुन्हे शाखेने दहा आरोपींना अटक केली आहे. तासवडे टोलनाक्यावर नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली असून सर्व आरोपी ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 January : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील चार संशयित आरोपींना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा पोलिसांच्या मदतीने पुणे-सातारा महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर नाकाबंदी करून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सोलापूर शहरात लपून बसलेल्या सहा जणांनाही पोलिसांनी अटक केली. जखमी राहुल सरवदेसह पाच जणांना यापूर्वीच पकडण्यात आले आहे. या सर्वांना न्यायालयाने आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, शिंदे गटातील तरुणांनी केलेला पहिला वार बाळासाहेबांनी चुकविला होता. मात्र दोन वार छातीवर झाल्याने होत्याचे नव्हते झाले.

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवारीसाठी शालन शंकर शिंदे आणि रेखा दादासाहेब सरवदे यांच्यात स्पर्धा होती. पण भाजपने शालन शिंदे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. मागील निवडणुकीत उमेदवारीवरून ही दोन्ही कुटुंबे आमने सामने आली होती. त्यावेळी समाजातील प्रतिष्ठीतांनी बैठक घेऊन पुढच्या वेळी रेखा सरवदे यांना उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता.

मागील निवडणुकीच्या (Election) वेळी देण्यात आलेल्या शब्द मोडल्याने रेखा सरवदे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, समाजात वितुष्ट नको; म्हणून रेखा सरवदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यासाठी समाजातील लोकांनी एकत्र येत तोडगा काढला होता.

रेखा सरवदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शालन शिंदे यांच्या कुटुंबातील काहींनी ‘तुमची मस्ती कशी जिरवली, नाद करायचा नाही, पर्मनंट नगरसेवक’ असे मोबाईलवर स्टेट्‌स ठेवले होते. तसेच, काहींनी दमबाजीही केली होती. त्याचा जाब विचारायला बाळासाहेब सरवदे गेले होते. त्या वेळी टोकाचा वाद झाला आणि त्या वादात शिंदे गटाकडील तरुणांनी बाळासाहेबांवर वार करायला सुरुवात केली. त्यावेळी बाळासाहेबांनी एक वार चुकविताना तो त्यांच्या हातावर बसला, पण दोन वार छातीवर जोरात बसले आणि त्यातच बाळासाहेबांचा मृत्यू झाला.

दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने माजी नगरसेवकेचा पती शंकर शिंदेसह चौघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर उर्वरित सहा संशयित आरोपींना जेलरोड पोलिसांनी शहरातूनच अटक केली. रविवारी सुट्टी असताना देखील ११ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुट्टीमुळे न्याायाधीशांना यायला विलंब झाला, तोपर्यंत संशयित आरोपी न्यायालयात थांबून होते. न्यायाधीशांनी संशयितांना पोलिस कोठडी ठोठावली. यात सरकारतर्फे ॲड. ज्योती वाघमारे यांनी तर संशयितांतर्फे ॲड. राहुल रूपनर यांनी बाजू मांडली. यावेळी पोलिस निरीक्षक भाऊराव बिराजदार उपस्थित होते.

बाळासाहेब सरवदे यांचा खून करून भाजप उमेदवार शालन शिंदेंचे पती शंकर शिंदे हे चौघांसह रात्रीच पसार झाले होते. ते चारचाकीतून पुण्याकडे निघाले होते. पण अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर त्यांनी प्लॅन बदलला आणि कोल्हापूरकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या सर्वांचे मोबाईल बंद होते. त्याचवेळी सोलापूर शहर गुन्हे शाखेचे पथक या सर्वांच्या मागावर होते.

शंकर शिंदेंसह चौघांनी सातारा-पुणे महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील तळबीड परिसरातील आणेवाडी टोल नाका पास केला. त्या वेळी सोलापूर पोलिसांनी तळबीड पोलिसांना संशयितांची माहिती दिली. त्यानंतर सातारा पोलिसांनी नाकाबंदी करून तासवडे टोल नाक्याजवळ संशयितांची गाडी पकडली. त्या गाडीत शंकर शिंदे, महेश भोसले, सुनील शिंदे, आलोक शिंदे हे चौघे होते.

सोलापूर शहर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील उर्वरित ११ संशयितांना जेरबंद केले आहे. त्यामध्ये विशाल शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, ईश्वर सिद्धेश्वर शिंदे, रोहित राजू सरवदे, महेश शिवाजी भोसले, शंकर बाबू शिंदे, अनिल शंकर शिंदे, शारदा तानाजी शिंदे, आलोक तानाजी शिंदे व विशाल ऊर्फ दादू संजय दोरकर यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने या सर्वांना आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT