Karmala, 25 April : गेली काही दिवसांपासून चर्चेत असलेला माजी आमदार नारायण पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उद्या (ता. 26 एप्रिल) प्रवेश होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत नारायण पाटील यांच्यासोबत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, करमाळ्याचे माजी सभापती, माजी पंचायत समिती सदस्य यांच्यासह सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
नारायण पाटील (Narayan Patil) यांना मागील 2019च्या निवडणुकीत शिवसेनेने तिकीट नाकारून रश्मी बागल यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शिवसेनेच्या रश्मी बागल या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या होत्या. नारायण पाटील आणि संजय शिंदे यांच्यात तुल्यबळ लढत झाली होती. मागील विधानसभेपासून आमदारकीची तयारी करणारे नारायण पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला हेाता. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharadchandra Pawar Party) पक्षात जाण्याबाबत त्यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानुसार नारायण पाटील यांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी सकाळी दहा वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत नारायण पाटील यांचा प्रवेश होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते या वेळी उपस्थित राहणार आहेत.
नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर 1999 ची पहिली निवडणूक करमाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली होती. त्यानंतर त्यांनी 2009 मध्ये जनसुराज्य पक्षाकडून, 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवून ते करमाळ्याचे आमदार झाले होते.
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही नारायण पाटील हे शिवसेनेतच होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत जाणे पसंत केले होते. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) नारायण पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.