सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तीन आणि काँग्रेसचे एक माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार होते, मात्र हा पक्षप्रवेश सध्या लांबणीवर पडला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रवेशावर हरकत घेतल्यामुळे, तसेच भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे, 27 ऑक्टोबरचा पक्षप्रवेश कार्यक्रम पुढे ढकलला गेला आहे.
राजन पाटील यांनी फलटणला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यामुळे त्यांच्या अचानक भेटीमागचे कारण राजकीय चर्चेचा विषय ठरले आहे.
Solapur, 26 October : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन, तर काँग्रेसचे एक असे चार माजी आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागल्याची चर्चा आहे, त्या पार्श्वभूमीवर मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी तातडीने फलटण गाठले. राजन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची एवढ्या तातडीने भेट घेण्याचे कारण काय, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil), यशवंत माने आणि माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव विक्रमसिंह आणि रणजितसिंह शिंदे यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या तीन माजी आमदारांसह काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही भाजप प्रवेश ठरला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील या चार माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाची 27 ऑक्टोबर ही तारीख ठरली होती. मात्र, दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला सोलापूर (Solapur) दक्षिण मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरुद्ध दर्शविल्यामुळे हे पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना प्रवेश देण्याबाबत भाजपच्या वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. मित्रपक्षातील नेत्यांच्या फोडाफोडीमुळे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वपक्षातील माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाला हरकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे सोमवारी (ता. २७ ऑक्टोबर) होणारे पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.
एकीकडे दिलीप माने यांना उघडपणे जाहीर विरोध होत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज होणे, हे महायुतीधर्माला जागणारे नाही, त्यामुळे चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाबद्दल भाजपकडूनही सबुरीचे धोरण घेतले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पालकमंत्री सोडता भाजपकडून या पक्षप्रवेशासंदर्भात अधिकृतपणे अद्याप कोणीही बोलायला तयार नाही.
दुसरीकडे, राजन पाटील आणि यशवंत माने यांनी भाजपत जाण्याचे निश्चित केले आहे. उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या हरकतींमुळे भाजप प्रवेश रखडू नयेत, यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे आज फलटण दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यात माजी आमदार राजन पाटील यांनी हजेरी लावली, त्यांना व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थानही देण्यात आले होते.
फलटण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील मिळू शकला नाही. मात्र, राजन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तातडीने फलटण का गाठले, याची खमंग चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Q1. किती माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार होते?
एकूण चार माजी आमदार राष्ट्रवादीचे तीन आणि काँग्रेसचे एक भाजप प्रवेश करणार होते.
Q2. पक्षप्रवेश कार्यक्रम का पुढे ढकलला गेला?
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध आणि अजित पवार यांच्या हरकतींमुळे तो पुढे ढकलला गेला.
Q3. राजन पाटील यांनी फलटणला का गाठले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीने भेट घेण्यासाठी ते फलटणला गेले.
Q4. भाजपकडून या विषयावर कोणती भूमिका घेतली आहे?
भाजपने या विषयावर अधिकृतपणे मौन ठेवत सबुरीची भूमिका घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.